Headlines

पारधी बेड्यावरील दिव्या काळेचे यश:खासदार काळे यांनी प्रत्यक्ष भेट घेत केला विद्यार्थीनीचा सत्कार‎




कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षणाची नवी पहाट कशी आणता येते, याचे आदर्श उदाहरण मोर्शी तालुक्यातील जामणीच्या पारधी बेड्यावर पाहायला मिळाले. येथील दिव्या रवींद्र काळे या विद्यार्थिनीने १२ वी सीबीएसई परीक्षेत ९१.२०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी थेट त्या पारधी बेड्यावर पोहोचून दिव्याचा विशेष सत्कार केला. तिला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ज्या पारधी समाजाला शासनदरबारी अजूनही अशिक्षित, मागासलेला आणि शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर मानले जाते, त्या समाजातून पुढे येत दिव्याने हे यश मिळवले आहे. कोणत्याही विशेष सोयी-सुविधा किंवा अनुकूल परिस्थिती नसताना तिने थेट केंद्रीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. दिव्याच्या या यशात तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे. तिची आई स्वतः ९ वीपर्यंत शिकलेली आहे. वडील शेती व्यवसाय करतात. आपल्या मुलीला शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन देणारे तिचे आई-वडीलही तितकेच अभिनंदनास पात्र ठरले आहेत. दिव्याचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही. ते संपूर्ण पारधी समाजाची मान उंचावणारे आहे. ते इतर समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. अशा प्रतिक्रिया समाजातून पुढे आल्या आहेत. याच दौऱ्यादरम्यान खासदार अमर काळे यांनी जामणी येथील इतर दोन गुणवंत विद्यार्थिनींचीही भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. श्रेया दुधाने हिने १० वीच्या बोर्ड परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळविले आहेत. अनुष्का बुधबावरे हिने १२ वीच्या बोर्ड परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत. या कौतुक सोहळ्याप्रसंगी खासदार अमर काळे यांच्यासोबत अभ्युदय मेघे, संजय काकडे, विजय घवघवे, प्रमोद काकडे, बाळू वरकड आदी उपस्थित होते. हे यश आश्चर्यकारकच ^शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजातील एका मुलीने सीबीएसईसारख्या कठीण परीक्षेत ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि आश्चर्यकारक बाब आहे. – अमर काळे, खासदार, अमरावती-वर्धा मतदारसंघ.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *