Headlines

पाळोदी येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या:नापिकी अन कर्जाचे कारण, कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद




कळमनुरी तालु्क्यातील पाळोदी येथे अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी ता. ३१ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील शेतकरी गजानन शिंदे (३५) यांना पाळोदी शिवारात चार एकर शेत आहे. या शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. घरी पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या शेतीवर त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. खरीप हंगाम हाती आल्यानंतर पिककर्ज फेडण्याचील तयारी त्यांनी केली होती. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. शेतातील सोयाबीन व इतर पिकांच्या लागवडीचा खर्चही निघाला नाही. मात्र रब्बी हंगामात थोडेफार उत्पन्न मिळेत या आशेवर शिंदे कुटुंबिय होते. मात्र रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, खरीप हंगाम व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडावे अन कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. कर्ज कसे फेडावे याची चिंता असल्याचे ते सतत बोलून दाखवत होते. त्यानंतर शनिवारी ता. ३० सायंकाळी ते शेतातून जनावरांसाठी वैरण आणतो असे सांगून ते शेतात गेले. मात्र रात्री उशीरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहणी केली असता गजानन यांचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी शेतात गर्दी केली. तसेच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, जमादार सतीष शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वर्षा शिंदे यांच्या माहितीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार शेळके पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *