Headlines

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू:खालापूरजवळ दोन अवजड वाहने, कारची धडक; मिसिंग लिंक तासभर बंद




पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर फूड मॉलजवळ सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. दोन अवजड वाहने आणि एका एर्टिगा कारची धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारा ‘मिसिंग लिंक’ मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास मुंबई वाहिनीवर किमी ३६.५०० जवळ घडला. पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या तांदळाने भरलेल्या ट्रकने (क्रमांक एपी.39.टीझेड.1349) नियंत्रण सुटल्याने समोर चालणाऱ्या खाद्यतेलाच्या कंटेनरला (क्रमांक जीजे.23.एडब्ल्यू.4423) आणि डाव्या बाजूने जात असलेल्या एर्टिगा कारला (क्रमांक एमएच.31.जीए.5203) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रक रस्त्यावर पलटी झाले, ज्यामुळे महामार्गाच्या चारही मार्गिका बाधित झाल्या. या दुर्घटनेत तांदळाच्या ट्रकचे चालक व क्लिनर यांचा गंभीर दुखापतींमुळे जागीच मृत्यू झाला. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. एर्टिगा कारमधील लिलाबाई सस्ते (वय ८०, रा. खारघर) गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच, कारमधील मुकिंदा सस्ते (वय ५६) आणि कंटेनर चालक महेंद्र पाल (वय ३९, रा. गांधीधाम, गुजरात) हे किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ खोपोली ग्रामीण रुग्णालय व कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मालवे, पोलीस उपनिरीक्षक सरोदे, ‘आयआरबी’ची पेट्रोलिंग व देवदूत टीम, तसेच सामाजिक संस्था खोपोलीचे गुरुनाथ साठीलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेन व हायड्राच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर सांडलेला माल बाजूला सारून बंद असलेली ‘मिसिंग लिंक’ वाहतुकीसाठी पुन्हा खुली करण्यात आली. सुदैवाने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *