![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर आजचा माणूस मोबाईलच्या आभासी दुनियेत इतका हरवून गेला आहे की, तो मनमोहन श्यामसुंदरला विसरला आहे. आपली बुद्धी शुद्ध आणि पवित्र आहे, ती या जन्मातच श्रीकृष्ण चरणी समर्पित करा. वसुदेव-देवकीसारखे मन आणि बुद्धी देवाच्या चरणी लावली, की जीवनातील सर्व अंधःकार दूर होईल, असे आवाहन ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, डॉ. अंजली फाटके, अशोक कानडे, मदन कांबळे, मगनभाई पटेल, राजूभाई पटेल, मिलिंद चवंडके, बाली जोशी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमान रेवतीनंदन दास म्हणाले, आज जगात सर्वत्र अशांतता आहे, कारण शांतता कोणत्याही मार्केटमध्ये विकत मिळत नाही. ज्या घरात भगवान श्रीकृष्णाची पूजा होत नाही, नामजप होत नाही आणि देवाला नैवेद्य दाखवला जात नाही, त्या घरातील लोक डिप्रेशनमध्ये (नैराश्यात) दिसतात. याउलट, ज्या घरात अखंड नामसंकीर्तन चालते, ते घर मंदिर बनते आणि तिथे नकारात्मकतेला थारा मिळत नाही. रेवतीनंदन दास यांनी निरूपणातून शुद्धतेची सोपी व्याख्या मांडली. ते म्हणाले, शरीर स्नानाने शुद्ध होते, गर्भ संस्काराने, इंद्रिये तपाने, तर धन दानाने शुद्ध होते. जेव्हा मनात संतोष निर्माण होतो तेव्हा मन शुद्ध होते आणि आत्मज्ञानाने आत्मा पवित्र होतो. या सोहळ्याचा शहरासह उपनगरातील हजारो भाविकांनी भक्तीभावाने लाभ घेतला. श्रीकृष्ण हे जगातील पहिले पॉझिटिव्ह व्यक्तिमत्त्व भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले पॉझिटिव्ह व्यक्तिमत्त्व होते. महाभारतासारख्या युद्धातही त्यांनी हसत-हसत भगवद्गीता सांगितली. कठीण प्रसंगाला विवेकाने कसे सामोरे जावे, हे त्यांनी शिकवले. त्यांचे हे मार्गदर्शन आजही उपयुक्त असल्याने श्रीकृष्ण कथेचे आयोजन होणे गरजेचे आहे, असे रेवतीनंदन दास म्हणाले.
Source link
मोबाईलच्या दुनियेत हरवताना मनमोहन श्रीकृष्णाला विसरू नका:रेवतीनंदन दास यांचे आवाहन, शुद्ध बुद्धी भगवंताच्या चरणी समर्पित करा