![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहर व उपनगर परिसरात ५० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. तर, बंगाल चौकी परिसरात एक भिंत कोसळली. परिणामी, अनेक वाहनांचे नुकसान झाले. तर, वीजवाहक तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. एकाचवेळी अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने दुरुस्तीसाठी अपुरे कर्मचारी असल्याने महावितरणची धावपळ उडाली. सावेडी उपनगरात काही वसाहतींमध्ये तब्बल १९ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सावेडी, केडगाव, मध्य शहर, मुकुंदनगर, जीपीओ चौक अशा विविध परिसरात वादळामुळे झाडे उन्मळून पडली. बहुतांशी झाडे वीज वाहक तारांवर पडल्याने एकाचवेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. महापालिकेच्या उद्यान विभाग व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटेपर्यंत मोहीम राबवून पडलेली झाडे व फांद्या हटवल्या. दुसरीकडे वीज वाहक तारांच्या दुरुस्तीसाठी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. सावेडी उपनगरात काही ठिकाणी रविवारी रात्री ९ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान सुरळीत झाला. वीज नसल्याने उकाड्याने नागरिकांचे रात्रभर हाल मुख्य वीज तुटल्याने व काही रोहित्रांवर झाडे, फांद्या पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. सोमवारीही दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा येत होता. त्यामुळे सावेडी उपनगरात अनेक वसाहतींमध्ये रात्रभर व सोमवारी दिवसभरही वीजपुरवठा खंडितच होता. अनेकांच्या घरातील इन्व्हर्टरच्या बॅटर्याही डिस्चार्ज झाल्याने रात्रभर व सोमवारी दिवसभर उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.
Source link
वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या; शहरामध्ये १९ तास वीजपुरवठा खंडित:बंगाल चौकीत भिंत कोसळून वाहनांचे नुकसान