Headlines

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे बंड शमले:मुलाचा अर्ज मागे घेणार, म्हणाले – यापुढे त्रास होणार नाही याची गॅरंटी दिली




गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा त्रास यापुढे होणार नाही, याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सत्तार यांनी आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिवसेनेचे सहा आमदार आणि खासदारांनी महायुतीमध्ये एकजुटीने राहावे, असा आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपकडे गेली असून, तिथे सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी आपले पुत्र समीर सत्तार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी सत्तार यांनी भाजपवर ‘शिवसेनेचे मुंडके छाटण्याचे काम भाजप करत आहे’ असा गंभीर आरोप करत युतीबाबत फेरविचार करण्याचा इशाराही दिला होता. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अब्दुल सत्तार यांचे बंड शमवण्यात यश आल्याचे दिसून येत आहे. नेमके काय म्हणाले अब्दुल सत्तार? अब्दुल सत्तार यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “खालच्या स्तरावर आम्हाला जो काही त्रास झाला, तो भविष्यात होणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आमच्याकडून काही चूक झाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे कान पकडतील आणि मित्रपक्षाकडून काही झाल्यास मुख्यमंत्री स्वतः पाहतील. “माझ्या सर्व तक्रारी मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या असून त्यांनी त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. मला जे काही बोलायचे ते मी बोललो. आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण आपल्या मुलाचा अर्ज मागे घेणार आहे,” असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. सत्तारांनी आधी भाजपवर केली होती जहरी टीका या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. “भाजप शिवसेनेचे मुंडके छाटण्याचे काम करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. भाजपची वागणूक सुधारली नाही, तर युतीबाबत फेरविचार करावा लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या भूमिकेला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही पाठिंबा दर्शवत मित्रपक्षांच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *