Headlines

केंद्रीयमंत्री डॉ. मांडवियांच्या हस्ते 'जन सेहत सेतू'चे लोकार्पण:'निरोगी भारत' संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी: डॉ. मांडविया




केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ या संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसह प्रत्येकाने यात योगदान देणे आवश्यक आहे. त्यांनी ‘जन सेहत सेतू’ आरोग्य शिबीर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले, जिथे महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले जातील. डॉ. मांडविया ‘जन सेहत सेतू’ शिबिराच्या उद्घाटन व पोर्टलच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. सिम्बॉयसिस ऑडिटोरियम, विमाननगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. कृष्णप्रकाश, आरोग्य अधिकारी नीना बोराडे, न्यूरोमायलिटिस ऑप्टिकाचे अध्यक्ष अमोल लुंकड आणि संघटक प्रशांत चौधरी यांच्यासह विविध संघटना व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. मांडविया पुढे म्हणाले की, देशातील नागरिकांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी वैद्यकीय व्यावसायिकांवर आहे. ७५ वर्षांपूर्वी आरोग्य सेवा सहज उपलब्ध नव्हत्या; त्यावेळी वेदशाळांच्या माध्यमातून उपचार केले जात होते आणि पैशाला प्राधान्य दिले जात नव्हते. त्यामुळे डॉक्टरांचे काम केवळ व्यवसाय नसून एक मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पुणे शहरातील विविध संघटना व संस्थांनी एकत्र येऊन दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी ‘जनसेहत सेतू अभियान’ राबवण्याचा घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने आपला वेळ, संपत्ती आणि ज्ञानाचे दान देऊन समाजाची सेवा करावी. आशासेविका, सेवाभावी संस्था आणि संघटनांनी या शिबिरांविषयी जनजागृती करून हे अभियान राष्ट्रव्यापी बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्यातील नागरिकांना तत्पर, दर्जेदार व मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे हे शासनाचे प्राधान्य आहे. आजारांचे स्वरूप आणि उपचारांच्या खर्चाबाबत नागरिकांमध्ये भीती असते. ‘जन सेहत सेतू’ अभियानाच्या माध्यमातून एक दिवस सेवेसाठी समर्पित करणे हे महाराष्ट्र आणि देशासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल. देशातील महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा शिबिरांची सुरुवात पुण्यातून होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *