![]()
जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते, हे पारनेर तालुक्यातील कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. ६० व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत रौप्यपदक पटकावून पारनेर महाविद्यालयाच्या साक्षी भंडारी हिने थेट जपानमध्ये होणाऱ्या ‘एशियन क्रॉस कंट्री’ स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे. तालुक्यातील अळकुटी येथील मोलमजुरी करणाऱ्या आईची लेक आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीवर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. वडील पक्षघाताने विकलांग, मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणारी आई.धावण्यासाठी अद्ययावत बुटांची आणि आधुनिक मैदानाची सोय नाही.अश्या सर्व प्रतिकुलतेवर मात राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत यश मिळवले आहे.इच्छाशक्ती प्रबळ असली की गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती यशाच्या आड येत नाही अळकुटी सारख्या छोट्या गावातील साक्षी भंडारीने अधोरेखित केले आहे. साक्षीचे वडील अर्धांगवायूचा आजार असल्याने कुटुंबाचा संपूर्ण डोलारा तिच्या आईवर आहे. आई मोलमजुरी करून घराचा गाडा ओढते. अशा खडतर परिस्थितीत साक्षीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांभाळत, वडिलांची सेवा करत आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपला धावण्याचा सराव अविरत सुरू ठेवला. साक्षीची मोठी बहीण शितल हिने शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धेत मिळविलेले यश साक्षीसाठी प्रेरणादायी ठरले. गावात सुसज्ज मैदानाची कोणतीही सुविधा नसताना साक्षीने आळकुटीच्या मोकळ्या माळरानावर सराव सुरू केला. या प्रवासात तिला प्रशिक्षक श्रीराम आवारी यांचे मार्गदर्शन लाभले.चालू शैक्षणिक वर्षात साक्षीने पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात’ प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला.तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांचे प्रोत्साहन आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संजय गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या दर्जेदार क्रीडा सुविधांमुळे तिचा सराव अधिक शास्त्रीय आणि योग्य पद्धतीने होऊ लागला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून साक्षीने एकूण आठ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यात दोन सुवर्णपदके तर सहा रौप्यपदकांची कमाई तिने केली आहे. साक्षीची मोठी बहीण भाग्यश्री भंडारी ही पारनेर महाविद्यालयाच्या मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी आहे. तिनेही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. बहिणींचा हाच वारसा साक्षीने समर्थपणे पुढे नेला आहे. सध्या प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या साक्षीने आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा डौलाने फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तिच्या या जपानवारीसाठी संपूर्ण तालुक्यातून आणि क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पन्नासहून अधिक स्पर्धांत सहभाग साक्षीने आजपर्यंत पन्नासहून अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला यातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तिने तीस पदकांची कमाई केली तर राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेऊन दहा पदके प्राप्त केली आहेत.
Source link
मोलमजुरी करणाऱ्या माऊलीची लेक साक्षी जपानमध्ये धावणार:प्रतिकूल परिस्थितीवर मात करत "एशियन क्रॉस कंट्री''साठी निवड