Headlines

‘विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करा, माझ्यावर गुन्हे दाखल करा’:आमदार रोहित पवारांचा पुणे पोलिसांना इशारा; 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल




राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाप्रकरणी पुणे पोलिसांनी 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा,” असे आव्हान त्यांनी पुणे पोलिसांना दिले आहे. रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुणे पोलिसांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, पुणे पोलिस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला 1 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पेपरफुटी समोर आणणारा ऋषिकेश गांगुर्डे याच्यासह ओमकार पाटील, गजानन शेळके, सोमनाथ चव्हाण आणि संकेत कणसे उपस्थित नसताना, ते गावी असताना देखील त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पोलिसांना कसे दिसले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे रोहित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांचे वर्णन करताना प्रमोद पाटील यांचे लिंग महिला दाखवले आहे, तर प्रियांका चौधरी यांचे लिंग पुरुष दाखवले आहे. FIR मध्ये इतक्या चुका? हे सर्व पाहता, FIR करणारा अधिकारी पेपर फोडून आला की काय, असा प्रश्न पडतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. माझ्यावर गुन्हे नोंद करा असो, वरून मालकाचे आदेश ऐकून पोलिस वागायला लागले की असेच होते. हे विद्यार्थ्यांवरील सरकारचे दबावतंत्र आहे. पण या दबावाला विद्यार्थी घाबरणार नाहीत. हे सर्व गुन्हे जामीनपात्र असून, वकिलांची मोठी फौज आम्ही उभी केली आहे. त्यामुळे सरकारने असे खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा भ्रष्ट भीमनवारला पदावरून हाकलावे. तो सरकारचा जावई आहे का? खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, असे थेट आव्हान रोहित पवारांनी केले आहे. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न त्यानंतर रोहित पवारांनी आणखी एक पोस्ट करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले की, आधी परवानगी द्यायची आणि नंतर सरकारच्या दबावाखाली ती धुडकावून लावत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायचे, हा नेमका कारभार आहे तरी कसा? असा प्रश्न त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित केला आहे. पुढे रोहित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला पुणे पोलिसांनी आधी परवानगी दिली होती. मात्र स्वतः दिलेली परवानगी ग्राह्य न धरता सरकारचे ऐकून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे आज दुसऱ्यांदा सत्याग्रह आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी तीन अर्ज दाखल केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *