Headlines

पुणे शिक्षक मतदारसंघातून चिवटेंची माघार:भाजपचे कौस्तुभ गावडेच महायुतीचे उमेदवार, पदवीधर मतदारसंघातही बंडखोरी शमली




राज्यात विधानपरिषद (पदवीधर आणि शिक्षक) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण झालेला बंडखोरीचा तिढा अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. पुणे आणि मराठवाडा मतदारसंघात परस्परांविरोधात उभे राहिलेले महायुतीचे बंडखोर आणि घटक पक्षांचे उमेदवार यांनी अर्ज मागे घेतल्याने आता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यात शिवसेनेची माघार पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने मोठी चर्चा रंगली होती. मात्र, आज या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याबाबत माहिती देताना शिवसेना नेते रवींद्र धंगेकर म्हणाले, “मंगेश चिवटे यांनी गेली कित्येक वर्षे आरोग्य दूत म्हणून आणि शिक्षकांसाठी मोठे काम केले आहे. कार्यकर्त्यांचा त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत मोठा आग्रह होता. मात्र, पक्षाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेतली आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांनी आदेशाचे पालन केले आहे.” तसेच, “शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना न्याय देण्याचा आणि कुठल्या ना कुठल्या रूपात विधानसभेत पोहोचवण्याचा मोठा शब्द दिला आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली. पुण्यात महायुतीचा मार्ग मोकळा मंगेश चिवटे यांच्या माघारीसोबतच, पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे आणि पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील. मुख्यमंत्र्यांच्या एका फोनवर मराठवाड्यातही बंडखोरी शमली दुसरीकडे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, तिथे भाजपचे नेते एम. के. देशमुख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट फोन आल्यानंतर एम. के. देशमुख यांनीही निवडणुकीतून आपली माघार जाहीर केली आहे. भाजप नेते रामराव शेळके यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, देशमुखांच्या माघारीमुळे आता मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात सतीश चव्हाण हे महायुतीचे एकमेव आणि अधिकृत उमेदवार राहिले आहेत. राज्यभरातील या जागावाटपातील तडजोडीमुळे महायुतीने बंडखोरी यशस्वीपणे शमवली आहे. ————— हेही वाचा.. 30 ऑक्टोबरपर्यंत ‘शिवसेना आणि धनुष्यबाणा’चा निकाल लागणार?: दिवाळीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम फैसला होण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे तोंडी निर्देश
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या, शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फूट, मूळ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईचा अंतिम निकाल आता अत्यंत जवळ आला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाटपावरील सर्व सुनावणी 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून हे प्रकरण निकाली काढण्यात येईल, असे स्पष्ट तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्यामुळे आगामी दिवाळी सणापूर्वी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम फैसला येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले असून, ‘धनुष्यबाण’ कोणाचा यावर सर्वोच्च न्यायालयाची अंतिम मोहोर उमटणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *