![]()
देशातील लोकशाही, मतदानाचा अधिकार आणि तरुणांच्या आंदोलनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमध्ये आंदोलनासाठी जाणाऱ्या तरुणांना रोखले जात असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘देशात इमर्जन्सी लागू केली आहे, पण इमर्जन्सी असल्याचे बोलण्याची हिंमत भाजपमध्ये नाही,’ अशी टीका त्यांनी केली. तसेच सरकारला तरुणांची भीती वाटत असल्याचा दावा करत देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘सरकारला तरुणांची एवढी भीती का?’ दिल्लीमध्ये रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आल्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी तरुणांच्या आंदोलनाबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका केली. देशभरातून तरुण केवळ मतदानाचा अधिकार आणि आपला हक्क मागण्यासाठी दिल्लीला जात असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, लाठीचार्ज करणे आणि घरोघरी जाऊन अटक करणे, हे नेमके काय दर्शवते, असा सवाल त्यांनी केला. ‘ही इमर्जन्सी नाही तर आणखी काय आहे?’ असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘मुंबई आणि महाराष्ट्राची दिल्लीला भीती’ मुंबई किंवा महाराष्ट्रातून आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. मुंबई आणि महाराष्ट्राची भीती दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या मनात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनकर्त्यांना रोखणे, त्यांना ताब्यात घेणे आणि नजरकैदेत ठेवणे, या प्रकारांमधून सरकारची अस्वस्थता दिसत असल्याचे ते म्हणाले. देशात लोकशाही राहिलेली नसून भाजप सत्तेला चिकटून बसल्याचे चित्र दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. ‘भाजपच्या मनात देशप्रेम असेल तर त्यांनीही आंदोलनात यावे’ दिल्लीतील आंदोलनात शिवसैनिक सहभागी होणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी देशभरात जिथे-जिथे आंदोलने होतील, तिथे शिवसैनिक सहभागी होतील, असे सांगितले. केवळ राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर देशप्रेम असलेल्या प्रत्येकाने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपच्या मनात देशप्रेम असेल, तर त्यांनीदेखील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हान त्यांनी दिले. ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका; राष्ट्रपतींच्या भेटीकडे लक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन आणि राष्ट्रपतींची भेट घेण्याच्या नियोजनावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. ज्ञानेश कुमार यांनी पदावरून दूर व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ज्ञानेश कुमार यांना पाठिंबा देणाऱ्यांवरही टीका केली. मतदानाचा अधिकार, देशाचे संविधान आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकांसाठी हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. MPSC आंदोलनावरूनही निशाणा; ‘भीमनवार यांनी राजीनामा द्यावा’ पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थी एकीकडे घरची, आई-वडिलांची आणि शेतीची चिंता करत आहेत; तर दुसरीकडे त्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे ते म्हणाले. पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गोंधळाला जबाबदार असलेल्या व्यक्तीने पद सोडावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्री यांचे जवळचे असले, तरी एखाद्या व्यक्तीने सत्तेच्या पदाला किती चिकटून राहायचे, हे ठरवले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलला तर चुकीचे काय?’ MPSC आंदोलनामागे राजकारण होत असल्याच्या सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांवरही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. राजकीय पक्षांनी एखादा सार्वजनिक प्रश्न उपस्थित केला, तर त्यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लक्ष देण्याऐवजी आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याची टीका त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची असल्याचेही त्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट झाले. ——————- हेही वाचा.. MPSC आंदोलनाचा नववा दिवस: प्रकृती बिघडल्याने 3 विद्यार्थ्यांनी सोडलं उपोषण, रोहित पवार म्हणाले- अध्यक्षांच्या विकेटशिवाय आंदोलनाची सांगता नाही पुण्यात एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून हक्कांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काही विद्यार्थी अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे उपोषणाला बसलेल्या सातपैकी तीन विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. सविस्तर वाचा
Source link
देशात इमर्जन्सी लागू केलीय, पण बोलायची हिंमत नाही:आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले- सरकारला तरुणांची भीती, MPSC आंदोलनावरूनही निशाणा