![]()
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गौरव पदक, 30 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सई परांजपे यांनी बालनाट्य, प्रौढ नाटके, नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अनुवाद अशा विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा ‘मुलांचा मेवा’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. आई शकुंतला परांजपे आणि आजोबा रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या प्रोत्साहनातून त्यांच्या कलात्मक प्रवासाला दिशा मिळाली. आपल्या सर्जनशीलतेच्या आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाच्या बळावर त्यांनी मराठी रंगभूमीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. बालनाट्य आणि प्रौढ रंगभूमीवर ठसा सई परांजपे यांनी मुलांसाठी नऊ नाटके लिहिली असून, ‘पक्ष्यांचे कवीसंमेलन’, ‘पत्ते नगरीत’, ‘झाली काय गंमत’, ‘जादूचा शंख’ आणि ‘शेपटीचा शाप’ ही त्यांपैकी काही गाजलेली नाटके आहेत. ‘झाली काय गंमत’ आणि ‘शेपटीचा शाप’ या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकांचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची बालनाटके आजही शालेय स्तरावर सादर केली जातात. याशिवाय ‘नांदा सौख्यभरे’, ‘सख्खे शेजारी’, ‘जास्वंदी’, ‘सोयरीक’, ‘माझा खेळ मांडू दे’ आणि ‘मोगरा फुलला’ या नाटकांमधून त्यांनी प्रौढ रंगभूमीवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘जास्वंदी’ या नाटकाला 1978 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा पुरस्कार मिळाला, तर ‘सोयरीक’ नाटकाचाही उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरव करण्यात आला. तमाशा आणि नाट्यअनुवादातही योगदान महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाला हिंदी रंगभूमीवर नेण्यातही सई परांजपे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्लीत असताना त्यांनी ‘एक तमाशा अच्छा खासा’ आणि ‘धिक् ताम’ या तमाशाप्रधान नाटकांचे लेखन व निर्मिती केली. पती अरुण जोगळेकर यांच्यासह ‘नाट्यद्वयी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाट्यनिर्मिती केल्या. परांजपे यांनी विविध भाषांतील नाटकांचे मराठी आणि हिंदीत अनुवादही केले आहेत. नोएल कॉवर्ड यांच्या ‘ब्लाइथ स्पिरिट’ या नाटकाचे ‘इडा पिडा टळो’ आणि नील सायमन यांच्या ‘द ऑड कपल’चे ‘तुझी माझी जोडी जमली रे’ ही त्यांची मराठी रूपांतरे आहेत. तसेच विजय तेंडुलकर यांच्या ‘गिधाडे’ या नाटकाचे ‘गिद्ध’ हे हिंदी रूपांतर त्यांनी दिग्दर्शित केले. पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनी गौरव नाट्य आणि कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने 2006 मध्ये सई परांजपे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 2025 मध्ये त्यांना ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आता विष्णुदास भावे गौरव पदकाच्या माध्यमातून त्यांच्या दीर्घकालीन नाट्यप्रवासाचा आणि रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या लेखन, दिग्दर्शन आणि नाट्यनिर्मितीतील कार्यामुळे मराठी तसेच हिंदी रंगभूमी समृद्ध झाली आहे. सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट: • स्पर्श – 1980
• चष्मेबद्दूर – 1981
• कथा
• अंगूठा छाप – 1988
• दिशा – 1990
• पपीहा – 1993
• साझ – 1997
• भागो भूत – 2001
• चकचक – 2005
Source link
ज्येष्ठ नाटककार सई परांजपेंना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर:बालनाट्य, नाट्यलेखन आणि दिग्दर्शनातील योगदानाचा गौरव