![]()
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पुणे विभागात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदारसंघातून ४७, तर शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी ही माहिती दिली. त्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या दोन्ही मतदारसंघांचे कार्यक्षेत्र पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ४ लाख ५० हजार मतदार; १,०५१ मतदान केंद्रे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३ लाख ८८ हजार मतदार असून, त्यांच्यासाठी ७४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी ६२ हजार मतदार असून, त्यांच्यासाठी ३१० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे दोन्ही मतदारसंघांत मिळून सुमारे ४ लाख ५० हजार मतदार १,०५१ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ७५ उमेदवारांनी ८७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर ७० उमेदवारांचे ८१ नामनिर्देशन अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी २३ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिमतः ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ४९ उमेदवारांनी ६७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर ४८ उमेदवारांचे ६५ नामनिर्देशन अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर ३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदारांना मतदानाचे आवाहन दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उघले यांनी केले आहे. मतदान करताना मतपत्रिकेवरील सूचनांचे पालन करून आपले मत वैध राहील, याची मतदारांनी काळजी घ्यावी. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.
Source link
पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात 47 आणि 30 उमेदवार रिंगणात:23 ऑक्टोबरला मतदान, 27 ऑक्टोबरला बालेवाडीत मतमोजणी होणार