![]()
राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या जागेवर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजपकडून माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडत या जागेवर छगन भुजबळ यांना संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या या जागेचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची असून त्यावर पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याला संधी मिळणे आवश्यक आहे. विशेषतः छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला राज्यसभेत पाठवले तर त्याचे स्वागतच केले जाईल. मात्र, या जागेवर भाजपच्या विचारसरणीशी संबंधित किंवा भाजपच्या पाठिंब्याची व्यक्ती उमेदवार म्हणून आली, तर त्याचा चुकीचा संदेश राज्यभर जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी यावेळी अधिक तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले की, राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा जर भाजपप्रेरित व्यक्तीला देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर झुकली किंवा दिल्लीच्या दबावाखाली काम करत आहे, अशी भावना निर्माण होईल. त्यामुळे पक्षाने या निर्णयाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबतही अप्रत्यक्ष आवाहन केले. तसे शक्य नसेल, तर किमान छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला संधी देऊन पक्षाची स्वतंत्र भूमिका कायम ठेवावी, असे ते म्हणाले. राज्यसभा जागेच्या चर्चेसोबतच रोहित पवार यांनी पुणे विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींवरही भाष्य केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याच्या निर्णयाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमच्या उमेदवाराने माघार घेणे योग्य नव्हते, असे सांगतानाच त्यांनी त्या उमेदवाराच्या प्रामाणिकपणाचे समर्थनही केले. मात्र, निवडणुकीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जात असल्याची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. विधान परिषद सक्षम लोकांची निवडणूक बनत चालल्याची खंत विधान परिषद निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी प्रचंड आर्थिक ताकद लागते, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. काही ठिकाणी उमेदवारीसाठीच 50 ते 60 कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याच्या चर्चा आहेत, तर निवडून येण्यासाठी आणखी मोठा खर्च करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. अशा वातावरणामुळे विरोधी पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे विधान परिषद निवडणूक ही सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा मोजक्या आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांची निवडणूक बनत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
Source link
रोहित पवारांचा सुनेत्रा पवारांना थेट इशारा:भुजबळांनाच राज्यसभेत पाठवा; अन्यथा NCP भाजपसमोर झुकली असा संदेश जाईल