Headlines

भगवंत दिसत नसला तरी प्रत्येक कणात विराजमान- साक्षी महाराज:खंडाळ्यातील संत गोरोबाकाका मंदिरात कीर्तन‎




भगवंत डोळ्यांनी दिसत नसला तरी तो प्रत्येक कणात विराजमान आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य साक्षी दीपक महाराज ढोकळे यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील संत गोरोबाकाका मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी आयोजित कीर्तन सेवेप्रसंगी त्या बोलत होत्या. कीर्तनाची सुरुवात अभंग, भारूड आणि विविध दृष्टांतांनी झाली. भक्तीचा महिमा सांगताना साक्षी महाराज म्हणाल्या, वारा दिसत नाही पण त्याची झुळूक जाणवते, विद्युत प्रवाह दिसत नाही, पण दिवा जळतो आणि श्वास दिसत नसला तरी त्यावर जीवन टिकून असते. अगदी त्याचप्रमाणे भगवंत डोळ्यांनी दिसत नसला तरी तो प्रत्येक कणात विराजमान आहे. माणूस बाहेर देव शोधत मंदिर आणि तीर्थक्षेत्रे पालथी घालतो. परंतु, जोपर्यंत तो स्वतःच्या अंतःकरणात डोकावत नाही आणि मनातील विकार दूर करत नाही तोपर्यंत त्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकत नाही आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. संत गोरोबाकाकांचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, गोरोबाकाकांनी कर्म करतानाही नामस्मरण सोडले नाही म्हणूनच त्यांना संतपद मिळाले. आजच्या धावपळीच्या युगात माणसाने ईश्वरासाठी व स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. कीर्तनाची सांगता सामूहिक हरिपाठ, टाळ-मृदंगाच्या गजरात भजन व महाआरतीने झाली. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळ्यास भजनी मंडळ, टाळकरी, विणेकरी आणि ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *