Headlines

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट:मॉडेल कॉलनीत ज्येष्ठ डॉक्टरच्या घरातून 9 लाखांचे दागिने लंपास, वसतिगृहातही चोऱ्या




पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात एका ज्येष्ठ डॉक्टरच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय मॉडेल कॉलनीतील लकाकी रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. 25 जुलै रोजी मध्यरात्री ते सदनिका बंद करून बाहेर गेले असताना चोरट्यांनी कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटात ठेवलेले डिजिटल लॉकर फोडून नऊ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. शहर परिसरात सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच बिबवेवाडी भागात एका सदनिकेचे कुलूप तोडून 19 लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. वसतिगृहातून लॅपटॉप चोरीला दरम्यान, शनिवार पेठेत एका खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटॉप चोरीला गेल्याची घटनाही समोर आली आहे. या प्रकरणी एका तरुणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण शनिवार पेठेतील श्री अमृतेश्वर मंदिर परिसरातील वसतिगृहात राहतो. वसतिगृहातील खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने 40 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. वसतिगृहात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस हवालदार एस. मुंढे या प्रकरणाचा तपास करत आहेत. याशिवाय, खराडी भागातील एका वसतिगृहातून एका तरुणीची 50 हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस हवालदार एन. पाटील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *