Headlines

पुण्यात नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:आंबेगाव पोलिसांकडून 5 जणांना अटक, 50 बाटल्या जप्त




नशेसाठी इंजेक्शनचा बेकायदेशीर वापर आणि विक्री करणाऱ्या टोळीचा आंबेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मेफिवान या औषधी इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांना कात्रज-दत्तनगर रस्त्यावर काही जण नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात मेफेंटरमाईन सल्फेट या इंजेक्शनच्या 50 बाटल्या आढळून आल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अथर्व इंद्रजीत शिंदे (वय 24, रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय 22, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी), प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय 26, रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंबेगाव), पियूष गणेश भरम (वय 26, रा. कचरावत चाळ, आंबेगाव) आणि लक्ष्मण परमेश्वर माने (वय 19, रा. माने निवास, साईसिद्धी चौक, आंबेगाव) यांचा समावेश आहे. पोलिस कर्मचारी नितीन कातुर्डे यांनी या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही जण या इंजेक्शनचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत होते, तर काही जण त्याचा नशेसाठी उपयोग करत होते. या इंजेक्शनची बेकायदेशीरपणे आणि जास्त दराने विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक चांगदेव सजगणे, सहायक निरीक्षक स्वाती देवधर, उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलिस कर्मचारी नितीन कातुर्डे, अजय कामठे आणि सुभाष मोरे यांच्या पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *