![]()
विमान चालवणं हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर ती एक कला आहे. हवेत हजारो फूट उंचावर असताना जेव्हा आव्हाने समोर येतात, तेव्हा तुमची प्रसंगावधानता आणि टीमवर्कच तुम्हाला सुरक्षित जमिनीवर आणू शकतं, असे प्रतिपादन कॅप्टन नीलम इंगळे-लोबो (लाईन ट्रेनिंग कॅप्टन, एअरबस ए-३५०) यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मांडवे (सद्गुरूवाडी) येथील जगदंबा देवी मंदिर परिसरात संदीप राठोड यांच्या कल्पनेतून आयोजित ‘आनंदवन निसर्ग श्रमसाधना शिबीर-२०२६’ च्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक धर्मराज सालविठ्ठल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन रॉबिन लोबो (बोईंग-७७७ कमांडर), सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ, संतोष महाराज शास्त्री, आयएफएस अक्षय पवार, सरपंच राजेंद्र लवांडे आदी उपस्थित होते. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात पर्यावरण संवर्धनाचे, माणुसकीचे संस्कार गिरवले.कॅप्टन इंगळे-लोबो म्हणाल्या, माझा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे ‘चूल आणि मूल’ हीच महिलांची ओळख होती. माझी आई शिकली, प्राध्यापिका झाली आणि तिथून आमची पिढी बदलली. निसर्गातील झाडे स्वतः उन्हात जळतात, सोसतात, पण इतरांना सावली आणि फळे देतात. मुलगीही तशीच असते, जी स्वतः सोसून दोन्ही घरांना सावरून धरते. म्हणूनच, मुलींना आणि झाडांना जगवणे ही आपली संस्कृती आहे. जेव्हा दोन विमाने समोरासमोर येतात आणि पायलट्सना वाटते की आता टक्कर होणार, तेव्हा विमानातील अत्याधुनिक यंत्रणा आपापसात संवाद साधतात. अवघ्या काही सेकंदांत एक विमान वर जाते तर दुसरे खाली, ज्यामुळे हवेतील मोठे अपघात टळतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विमान प्रवासातील कॅबिन प्रेशर आणि सुरक्षेविषयीही त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. आज आपण स्त्री सक्षमीकरणावर खूप बोलतो, मुलींना शिकवतो. पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अजूनही पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे प्रमाण केवळ १२ ते १३ टक्केच आहे. हे प्रमाण जेव्हा किमान ४५ ते ५० टक्के होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला समाज सुधारेल, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक सुनील मरकड यांनी, तर अभ्यासपूर्ण सुत्रसंचालन अशोक व्यवहारे यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सुर्यकांत काळोखे, सुनील मरकड, गणेश कांबळे, सुधाकर ढाकणे, युवराज जगताप आदींनी परिश्रम घेतले. कॅप्टन नीलम यांनी पायलट बनण्याच्या प्रवासातील पडद्यामागची कथा त्यांनी मांडली. जेव्हा मी पायलट बनण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा घरातून विरोध झाला. मुलगी आहे, इंजिनिअरिंग किंवा आयटी करू दे, असा सल्ला मिळाला. कारण पायलट ट्रेनिंगचा खर्च सामान्य कुटुंबाला परवडणारा नव्हता.पण नीलम आपल्या जिद्दीवर ठाम होत्या, त्यांनी घरात अडीच वर्षे कोणाशीही न बोलता ‘सत्याग्रह’ केला. माझ्या सत्याग्रहापुढे कुटुंबियांना नमावे लागले. टाटा स्कॉलरशिप आणि मुख्यमंत्री निधीतून माझे स्वप्न पूर्ण झाले, असे कॅप्टन नीलम यांनी सांगितले.
Source link
आव्हानांवरती मात देत विमान सुरक्षित उतरवणे हीच खरी कला:कॅप्टन नीलम इंगळे-लोबो यांनी उलगडले आकाशातील अनुभव