Headlines

SIR मुळे प्रशासनाची धावपळ:अमरावती जिल्ह्यातील 9 लाख मतदारांची नावे वगळण्याची भीती




अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख नागरिकांनीच गणना फॉर्म भरले आहेत. यामुळे ९ लाख नागरिक अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. वेळेत फॉर्म न भरल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची भीती असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत जून महिन्यापासून मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत पूर्णपणे नवीन मतदार यादी तयार केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन गणनापत्रक भरण्याचे आवाहन केले आहे. गणनापत्रक भरले नसल्यास त्यांची नावे आगामी प्रारूप मतदार यादीमधून वगळली जातील. मतदारांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या केंद्रावर मतदान केले होते, त्याच ठिकाणी उपस्थित राहावे. तेथे उपस्थित बीएलओकडून गणनापत्रक प्राप्त करून ते पूर्ण भरून त्वरित जमा करावे. यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. विशेष अभियान संपल्यानंतरही बीएलओ प्रत्येक घरात जाऊन गणना प्रपत्र भरून घेतील. यामध्ये मतदाराची सध्याची माहिती, पूर्वीच्या एआयआर यादीशी जुळवणी, जन्मतारीख तसेच मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक (ऐच्छिक) नोंदविण्यात येईल. प्रपत्रावर मतदार किंवा कुटुंबातील प्रौढ सदस्याची स्वाक्षरी आवश्यक असून भरलेल्या प्रपत्राची प्रत मतदाराला दिली जाईल. गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास बीएलओ संपर्कासाठी सूचना ठेवतील. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास आणखी दोन वेळा भेट दिली जाईल. सलग तीन भेटींमध्ये मतदार अनुपस्थित, स्थानांतरित किंवा उपलब्ध न झाल्यास त्याचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही. सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी मतदार याद्यांचा प्रारूप (मसुदा) प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. त्यावरील सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *