Headlines

अमरावतीच्या विकासावर अजितदादांचे प्रतिबिंब- संजय खोडके:जनसेवा सप्ताहात २५०० दाखल्यांचे वितरण, विविध योजनांचा लाभ




अमरावती शहराच्या विकासावर लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. जनसेवा सप्ताहांतर्गत आयोजित महाराजस्व अभियान व समाधान शिबिरात त्यांनी हे मत व्यक्त केले. या शिबिरात सुमारे २५०० विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘शोध प्रतिष्ठान’द्वारे हा जनसेवा सप्ताह सुरू आहे. सांस्कृतिक भवनात आयोजित या महाराजस्व अभियान व समाधान शिबिरात आमदार खोडके बोलत होते. सरकारमध्ये राहून अजितदादांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि राबवलेल्या योजनांचा अमरावती शहराला पुरेपूर लाभ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार सुलभाताई खोडके, मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर, महिला व बाल कल्याण सभापती ममता आवारे, नगरसेवक चंद्रकांत खेडकर, प्रशांत धर्माळे, मीनल सवाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, मनपा आयुक्त मंगेश गोदावले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव (महसूल) व शिवाजी शिंदे (निवडणूक), मनपाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे व भाग्यश्री बोरेकर, तहसीलदार विजय लोखंडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराजस्व अभियानात आरोग्य सुविधा व योजना शिबीर, राशन कार्ड शिबीर, महसूल कागदपत्रे व दाखले वितरण, कामगार योजनांची माहिती, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना शिबीर, एस.टी. महामंडळ सवलतीच्या दरात प्रवासासाठी एन.सी.एम.सी. कार्ड शिबीर, आधार कार्ड केंद्र, पीआर कार्ड वाटप, पट्टे वाटप, सारथी, बार्टी, आर्टीच्या योजनांची माहिती, समाज कल्याण विभागाच्या योजना, दिव्यांग कल्याणच्या योजना आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून अडीच हजार नागरिकांनी विविध दाखले प्राप्त केले. आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व लाभार्थींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप केले. प्रास्ताविकादरम्यान उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी महाराजस्व अभियानाच्या आयोजनामागची रूपरेषा स्पष्ट केली. समाज कल्याण विभागाचे श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले, तर नायब तहसीलदार श्रीकृष्ण गाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ध्वनिचित्रफीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुभेच्छा चित्रफीत आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाबद्दल माहिती दर्शविणारी चित्रफीतही दाखविण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *