महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला गेल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळ
.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आधी छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभेसाठी आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र पक्षांतर्गत चर्चेनंतर अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत घोषणा केली होती. संटनेतही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. यामुळेच त्यांच्या नावाचा विचार झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. राज्यसभेत जाणारे पुढील सदस्य म्हणून त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
प्रफुल्ल पटेल यांचे ‘राईट हँड’ असलेले राजेंद्र जैन आता राज्यसभेच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते राजेंद्र जैन अचानक राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विदर्भाबाहेर त्यांचे नाव तुलनेने कमी चर्चेत असले, तरी भंडारा-गोंदिया आणि पूर्व विदर्भाच्या राजकारणात राजेंद्र जैन यांचा शब्द आजही वजनदार मानला जातो.
पडद्यामागील रणनीतीकार ते दिल्लीतील प्रतिनिधी; विदर्भाच्या राजकारणातील ‘लो-प्रोफाइल पण पॉवरफुल’ चेहरा
एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री Praful Patel यांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून काम करणारे जैन आता राज्यसभेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे “PA ते Parliament” हा त्यांचा प्रवास सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रफुल्ल पटेल यांचे सर्वात विश्वासू सहकारी
राजेंद्र जैन यांची ओळख केवळ राष्ट्रवादीचे नेते म्हणून नाही, तर प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशीही आहे. राजकारणातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी पडद्यामागे राहून भूमिका बजावली. पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन उभे करणे, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधणे आणि निवडणूक रणनीती आखणे यामध्ये त्यांचा मोठा वाटा मानला जातो. विदर्भातील राष्ट्रवादीच्या अनेक राजकीय लढायांचे ते शांतपणे नियोजन करणारे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जातात.
पडद्यामागील कार्यकर्ता ते विधान परिषद सदस्य
संघटनात्मक कामाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. पक्षाने त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवले. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवला. ग्रामीण भागातील विकास, सिंचन, शिक्षण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली.
2016 चा पराभव; पण राजकीय वजन कायम
2016 मधील भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक विदर्भातील सर्वाधिक चुरशीच्या लढतींपैकी एक मानली जाते. या निवडणुकीत भाजपचे परिण फुके यांनी त्यांचा निसटता पराभव केला. मात्र, या पराभवानंतरही जैन यांचे राजकीय महत्त्व कमी झाले नाही. उलट, पक्ष संघटनेतील त्यांचा प्रभाव कायम राहिला आणि राष्ट्रवादीने त्यांच्यावर पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवणे सुरूच ठेवले.
विदर्भातील राष्ट्रवादीचा ‘संकटमोचक’
गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. पक्षफुटी, नेत्यांचे स्थलांतर आणि संघटनात्मक आव्हानांच्या काळात पूर्व विदर्भात पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यात राजेंद्र जैन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत ठेवणे, स्थानिक पातळीवरील नाराजी हाताळणे आणि पक्षाशी कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे हे त्यांचे मोठे योगदान मानले जाते. यामुळेच विदर्भात राष्ट्रवादीचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
शिक्षण क्षेत्रातही मजबूत उपस्थिती
राजकारणासोबतच शिक्षण क्षेत्रातही राजेंद्र जैन यांचा प्रभाव आहे. विदर्भातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या गोंदिया एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ राजकारणी म्हणून नाही, तर शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रशासकीय नेतृत्वाचीही आहे.
राज्यसभेची उमेदवारी म्हणजे निष्ठेचे फळ?
राजकीय विश्लेषकांच्या मते, राज्यसभेसाठी त्यांची निवड ही केवळ एका जागेची निवड नसून राष्ट्रवादीतील दीर्घकालीन निष्ठा आणि संघटनात्मक कामाची दखल आहे. छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना शेवटच्या क्षणी राजेंद्र जैन यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवला. यामागे त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्याशी असलेली जवळीक, विदर्भातील संघटनात्मक पकड आणि पक्षासाठी केलेले दीर्घकाळाचे काम हे प्रमुख घटक मानले जात आहेत.
राजकीय संदेशही महत्त्वाचा
राजेंद्र जैन यांना राज्यसभेत पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भालाही मोठे प्रतिनिधित्व दिल्याचा संदेश दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि मराठवाडा या भागांतील नेत्यांचे वर्चस्व असताना पूर्व विदर्भातील एका संघटनात्मक नेत्याला दिल्लीत संधी देणे हा पक्षाचा महत्त्वाचा राजकीय निर्णय मानला जात आहे.
PA ते Parliament…
एका स्वीय सहाय्यकापासून सुरुवात करून विधान परिषद, पक्ष संघटना आणि आता राज्यसभेपर्यंत पोहोचलेले राजेंद्र जैन यांचा प्रवास हा संयम, निष्ठा आणि पडद्यामागे राहून केलेल्या राजकारणाचे उदाहरण मानला जातो. प्रसिद्धीपासून दूर राहून संघटन उभी करणाऱ्या या नेत्याला आता राष्ट्रीय राजकारणात स्वतःची छाप पाडण्याची संधी मिळणार आहे.
संबंधित बातमी वाचा…
इतरांची मुलं मंत्री, तोच न्याय मला लावा:राज्यसभा उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले- मी नाराज नाही, भाजपने विरोध केला यात तथ्य नाही!

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या घडामोडीमागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय अट आणि महायुतीतील सत्तासमीकरणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी वाचा