![]()
अकोट-अकोला राज्य मार्गावरील देवरी फाटा हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा चौक मानला जातो. या चौकातून शेगावकडे जाणारा मुख्य मार्ग जात असल्याने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, या मार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देवरी फाटा येथे तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत, अशी आग्रही मागणी परिसरातील शेकडो व्यावसायिक, वाहनचालक व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. देवरी फाटा परिसरात दुकाने, हॉटेल्स, पेट्रोल पंप असल्याने येथे दिवसभर नागरिक व ग्राहकांची मोठी गर्दी असते. अकोट, अकोला आणि शेगाव या तीन महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा हा चौक असल्याने अवजड वाहने, एसटी बस, खासगी वाहने अतिवेगाने धावतात. त्यामुळे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ग्राहकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागत आहे. वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनांमुळे येथे किरकोळ अपघात वारंवार घडत असून, भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ^तीन मुख्य मार्गांना जोडणाऱ्या या चौकात वाहनांचा वेग नियंत्रित नसतो. नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकरसह आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाय त्वरित करावेत. – मंगेश गाडेकर, नागरिक. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकरसह वेगमर्यादेचे फलक, रिफ्लेक्टर, झेब्रा क्रॉसिंग आणि रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसणारी संकेत व्यवस्था तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी; अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडल्यास जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा स्थानिकांनी दिला. मागणीची तत्काळ दखल घेणे गरजेचे ^जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आताच स्पीड ब्रेकर उभारून नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करावे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. – सुरेश गायकवाड, नागरिक. दुर्घटना घडण्यापूर्वी गतिरोधक उभारा ^देवरी फाटा हा वर्दळीचा चौक असून दिवसभर ग्राहकांची मोठी ये-जा असते. भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती कायम असल्याने प्रशासनाने दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने स्पीड ब्रेकर उभारावेत. – गजानन गावंडे, स्थानिक व्यावसायिक. सुरक्षा उपाययोजना तातडीने उभारणे आवश्यक
Source link
अकोट-अकोला-शेगाव मार्गावर वर्दळ; पादचाऱ्यांचा जीव टांगणीला:देवरी फाट्यावर स्पीड ब्रेकर उभारा; नागरिकांचे साकडे