Headlines

साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार




साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील मोटारसायकलस्वाराचाही जागीच मृत्यू झाला आहे. मंगरूळजवळ हॉटेल वृंदावनसमोर भीषण दुर्घटना ही दुर्घटना सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळ हॉटेल वृंदावनसमोर घडली. मोटारसायकल (एमएच-18 सी-8719) आणि एसटी बस (एमएच-13 सीयू-7540) ही दोन्ही वाहने अमळनेरकडून धुळ्याकडे जात होती. त्याचवेळी धुळ्याकडून भरधाव वेगाने येणारी कार (जीजे-19 एएफ-3147) अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि समोरून येणाऱ्या एसटी बस व मोटारसायकलला जोरदार धडकली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक घटनास्थळाकडे धावले. मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. मोटारसायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. कारमधील पाच जणांनी जागीच प्राण गमावले. साखरपुड्यासाठी येत होते; संपूर्ण कुटुंबावर शोककळा
मृतांमध्ये गुजरातमधील व्यारा येथील खालील व्यक्तींचा समावेश आहे : हे सर्वजण अमळनेर येथे आयोजित साखरपुडा समारंभासाठी येत होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घालत आनंदाच्या प्रवासाचे दुःखद अंतात रूपांतर केले. 112 वर फोन अन् यंत्रणा तातडीने घटनास्थळी अपघाताची माहिती मिळताच 112 आपत्कालीन सेवेला कॉल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच पोलीस पाटील भागवत पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रवाना करण्यात आले. कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला दिले जीवदान या भीषण दुर्घटनेत एक लहान मुलगा कारमध्ये अडकून पडला होता. कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडल्यामुळे त्याला बाहेर काढणे अवघड झाले होते. ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करत कारचे वाकलेले भाग बाजूला केले आणि चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढले. या बचाव मोहिमेमुळे एका निरागस जीवाचे प्राण वाचले. अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही या मदतकार्याचे कौतुक केले. एसटीमधील प्रवासीही जखमी या अपघातात एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच इतर काही जणांनाही किरकोळ दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. उत्तर महाराष्ट्रात अपघातांची मालिका चिंताजनक अलीकडच्या काळात जळगाव, धुळे आणि नाशिक परिसरातील महामार्गांवर भीषण अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालक आणि समोरासमोरच्या धडकांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. मंगरूळजवळील या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. साखरपुड्याच्या आनंदासाठी निघालेल्या एका कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू आणि एका चिमुकल्याचे थोडक्यात वाचलेले प्राण या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हळहळला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *