Headlines

समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तक्रारीमुळे वरुड तालुक्यातील रस्त्यांची कामे ठप्प‎




गेल्या पाच वर्षांपासून वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली पांदण रस्त्यांची कामे एका समाजकंटकाच्या खोट्या तक्रारीमुळे प्रशासनाने अचानक बंद पाडल्याचा आरोप करत तालुक्यातील शेतकरी व मजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामे ठप्प झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ही कामे तातडीने पूर्ववत सुरू करावीत. विकासकामात खोडा घालणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अनेक पांदण रस्ते मंजूर करण्यात आले होते. मंजूर आदेशानुसार पुरवठादारांनी रस्त्यांचे साहित्य आणून मजुरांच्या साहाय्याने कामेही सुरू केली होती. मात्र, एका समाजकंटकाने एका राजकीय पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर करून या कामांविरोधात तहसील कार्यालयात खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा न करता प्रशासनाने पुरवठादारांची ‘मागणी’ रोखल्यामुळे संतप्त पुरवठादारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, तालुक्यातील सुरू असलेली विकासकामे अचानक ठप्प झाली आहेत. रस्त्यांची कामे अचानक रखडल्यामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. दुसरीकडे पुरवठादारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे शेतकरी आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करून अत्यंत कष्टाने हे रस्ते मंजूर करून घेतले होते. पुरवठादारांनी साहित्यही आणले होते. मात्र, एका व्यक्तीच्या खोट्या तक्रारीमुळे प्रशासनाने कामे थांबवून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. प्रशासनाने तातडीने पुरवठादारांची डिमांड काढून पावसाळ्यापूर्वी कामे सुरू न केल्यास, तालुक्यातील समस्त शेतकरी, मजूर आणि पुरवठादार एकत्र येऊन प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *