![]()
शहरात सोमवार, ८ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन नुकसान झाले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही भागांत वाहनांवर झाडे कोसळली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्या. गंभीर धोका निर्माण झाला होता. या आपत्कालीन परिस्थितीची गंभीर दखल घेत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर युद्धपातळीवर मदतकार्य राबवले. मंगळवारी (९ जून) सकाळी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरातील विविध वादळग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मदतकार्य सुरू असलेल्या ठिकाणांचा आढावा घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महत्त्वपूर्ण निर्देश दिले. रस्त्यांवरील उन्मळून पडलेली झाडे आणि कचरा हटवण्यासाठी जेसीबी, क्रेन आणि आधुनिक यंत्रसामग्रीची मदत घेतली जात आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन विभागाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी रात्रभर कार्यरत होते. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अधिक सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. हवामान खराब असताना आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. तसेच झाडे, वीजवाहिन्या, धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, उपअभियंता सुहास चव्हाण, दिनेश हंबर्डे, उद्यान निरीक्षक मुकेश खारकर यांच्यासह मनपाचे इतर कर्मचारी व पथके प्रत्यक्ष मैदानात उपस्थित होते. शहरातील जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी मनपाचे मदतकार्य अजूनही सातत्याने सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. रस्त्यांवरील अडथळे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करावी. वीज तसेच अन्य मूलभूत सेवा पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांशी योग्य समन्वय ठेवावा. – वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा.
Source link
शहरामध्ये वादळी पावसाचे थैमान; युद्धपातळीवर मदतकार्यास सुरूवात:आयुक्त वर्षा लड्डा यांनी केली पाहणी; जनजीवन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न