Headlines

वेलकम पॉइंटवर खासगी बसेसमुळे होणाऱ्या कोंडीने सर्वसामान्य बेजार:थांब्यासाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी‎




नागपूरकडून शहरात येतानाचे शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा ‘वेलकम पॉईंट’ परिसर सध्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसेसच्या थांब्यांमुळे निर्माण झालेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्जुन नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी मंगळवारी (दि. ९) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना निवेदन सादर केले. तसेच सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, वेलकम पॉईंट परिसरात अनेक खासगी बसेस प्रवाशांच्या प्रतीक्षेसाठी रस्त्याच्या मध्यभागी किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभ्या केल्या जातात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ही समस्या दररोज सायंकाळी सहा ते दहा आणि सकाळी सहा ते नऊ यावेळेत निर्माण होते. अनेकदा या बसेसमुळे आपत्कालीन सेवांवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका अनेकदा वाहतूक कोंडीत अडकतात. सायरन वाजवत असतानाही काही वाहनचालक रुग्णवाहिकांना मार्ग देण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनधिकृत बसथांब्यांमुळे परिसरात वारंवार किरकोळ अपघात घडत असून हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि जीविताशी संबंधित गंभीर प्रश्न म्हणून तो पुढे आला आहे. याशिवाय परिसरात अवैध व्यवसाय आणि संशयास्पद हालचाली वाढल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वी या भागात अंमली पदार्थांबाबत पोलिसांनी कारवाई केल्याचा उल्लेख करत अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना नगरसेवक गुड्डू धर्माळे, माजी नगरसेवक गोपाल धर्माळे, प्रमोद खंडारे, विरेंद्र भट, राहुल इंगळे, विशाल पवार, विशाल पाचघरे, महेश तराळ, सचिन निस्ताने, अमोल साबळे, निलेश खेडकर, नवनीत पाचघरे, अभिजीत तायवाडे, स्वप्नील देशमुख, आदेश मैदानकर, प्रणव पुसतकर, भावेश मैदानकर, मोहित मैदानकर, सुरज दहाट यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्जुन नगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात वेलकम पॉईंट परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे नमूद केले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या राहत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अनेकदा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून खासगी बसेससाठी शहराबाहेर स्वतंत्र आणि नियोजित थांबा उभारण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन उभारण्याचा निर्धार केला. वेलकम पॉईंटवरील वाढत्या समस्यांमुळे संताप; लोकआंदोलन उभारण्याचा निर्धार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *