![]()
राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अत्यंत सूचक आणि धारदार वक्तव्ये करत असून, त्यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. “गेल्या २६ वर्षांत काहीजण मेहनतीने पुढे आले, तर काहीजण कष्ट न करताच थेट पुढे निघून गेले,” असा टोला लगावत भुजबळांनी पक्षातल्याच काही नेत्यांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळांचा नेमका रोख कुणाकडे आहे? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, “नमस्कार ताकदीला होतो, चमत्काराला होतो. तुमच्या पाठीमागे किती आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत, यावरच सगळं काही ठरत असतं,” असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अचूक बोट ठेवलं. पक्षातील अंतर्गत नाराजीवर बोलताना ते म्हणाले, “आपापसात मतभेद होतात तेव्हा आपण घर सोडत नाही, आपण मतं मांडतो.” भुजबळांच्या नाराजीचे कारण काय? छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यास इच्छूक होते. मात्र, त्यासाठी त्यांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याची अट ठेवली होती. यावर भाजप आणि महायुतीकडून तातडीने कोणताही निर्णय न झाल्याने अखेर भुजबळांनी राज्यसभेवर जाणे त्यानंतर राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांना संधी दिली. या घडामोडींनंतर भुजबळांनी, “पक्षातील इतर नेत्यांच्या मुलाबाळांना जो न्याय मिळतो, तोच मलाही मिळावा,” अशी उघड इच्छा व्यक्त केली होती. पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करत असतो एकीकडे पक्षात डावलले जात असल्याची भावना बोलून दाखवतानाच, दुसरीकडे त्यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे कौतुक करत गुगली टाकली आहे. “अजित पवार सोडून गेले, त्यानंतर सुनेत्रा ताई पुढे आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्त्वाखाली मोठी प्रगती करेल.” तसेच, “अनेकांना वाटतं आम्हाला पक्षाने काही दिलं नाही. प्रत्येकाने काम करत राहिले पाहिजे. पदं कमी असतात, पण पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करत असतो. एकजुटीने काम करत राहावे, असं सांगतो,” असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. उद्याच्या वर्धापन दिनाकडे सर्वांचे डोळे! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी साजरा होणार आहे. आज सूचक विधानांची मालिका लावणारे छगन भुजबळ उद्याच्या मुख्य सोहळ्यात नेमकी काय भूमिका मांडतात आणि कोणावर निशाणा साधतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
Source link
काहीजण कष्ट न करताच पुढे जातात:नमस्कार फक्त ताकदीला अन् चमत्काराला होतो, छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य