![]()
सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेतील त्रुटी उघड करणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आमदार साजिद खान पठाण यांनी आढावा घेतला. विभागीय चौकशीत दोषी आढळणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. याप्रकरणी दोन सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी करण्यात आली. कक्षसेवकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गत आठवड्यात सर्वोपचार रुग्णालयात एका आदिवासी महिलेला आपल्या पतीला खांद्यावर उचलून उपचारासाठी घेऊन जावे लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार साजिद पठाण यांनी रुग्णालयाला भेट देत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मंगळवारी आमदार पठाण यांनी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर मंत्र्यांनी चौकशी समिती गठित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मुंबईहून परतल्यानंतर बुधवारी सकाळीच आमदार पठाण यांनी सर्वोपचार रुग्णालयात बैठक घेतली. प्रशासनाला निष्पक्ष चौकशीचे निर्देश दिले. या बैठकीला अधिष्ठाता डॉ. संजय सोनून, काँग्रेसचे मोहम्मद इरफान, मोहम्मद युसुफ, कशीश खान, सुवर्णरेखा विजय जाधव, राहुल सारवान, अंकुश तायडे, पराग कांबळे, अभिजित तवर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उपाय योजनांवर करण्यात आली चर्चा आढावा बैठकीत आ. साजिद खान पठाण यांनी भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला. घडलेल्या प्रकारामुळे अकोल्याच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगितले. रुग्णालयातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रुग्णसेवा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली. तसेच रुग्णालय प्रशासनाला काही सुधारणा उपाय सुचवले. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले.
Source link
"सर्वोपचार'च्या अनेक कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची टांगती तलवार:पत्नीची आजारी पतीला पाठीवर घेऊन फरफट