![]()
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मांजरीतील भापकर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा तीक्ष्ण शस्त्रे आणि मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय 26, रा. भापकर वस्ती, मांजरी, हडपसर), रामजीतसिंग रणजीतसिंग टाक (वय 27,रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि अभयसिंग सिंकदसिंग जुनी (वय 21,रा. सुखकर्ता कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलिस हवालदार अमित कांबळे यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मांजरीतील भापकर वस्ती भागातील रेल्वे पुलाजवळ चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. हे चोरटे वाहन चालकांना लुटण्याच्या तयारीत होते. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दुधानी, टाक आणि जुनी यांना पकडले. झटापटीदरम्यान त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. अटक करण्यात आलेले चोरटे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा कोयते, मिरची पूड आणि दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एन. डिगोळे करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत डेक्कन पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका गुंडाला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ (वय 35, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी मरळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरळ याच्याविरुद्ध डेक्कन, वाकड आणि देहूरोड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. डेक्कन पोलिस ठाण्यातील तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले, हवालदार सचिन गायकवाड आणि सागर घाडगे हे डेक्कन परिसरात गस्त घालत असताना त्यांना ही माहिती मिळाली. नदीपात्रात गुंड मरळ थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मरळ याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पी.आर. पाटील आणि सहायक आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सपना देवताळे, उपनिरीक्षक अजय भोसले, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, संजय दंडगुले आणि धनश्री सुपेकर यांनी ही कारवाई यशस्वी केली.
Source link
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई:मांजरीतून दरोडेखोरांची टोळी गजाआड, 2 पिस्तुले, 6 काडतुस अन् तीक्ष्ण शस्त्रांचा साठा हस्तगत