Headlines

राज ठाकरेंचा 14 जूनला वाढदिवस:मनसैनिकांसाठी खास संदेश, होर्डिंग्जऐवजी वृक्षारोपण करण्याचे आवाहन




महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस असून, यंदा त्यांनी मनसैनिकांना एक वेगळाच संदेश दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची भेट होणार नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी शुभेच्छांच्या होर्डिंग्ज, फलक आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पोस्टद्वारे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी ते मुंबईत नसल्यामुळे मनसैनिकांना त्यांची भेट घेता येणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंकडून वृक्षारोपण करण्याचे आवाहन
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वृक्षारोपण करण्याचे, लावलेल्या झाडांची जबाबदारी घेण्याचे तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणवठे उभारण्याचे आवाहन केले आहे. शहरभर शुभेच्छांचे फलक लावण्याऐवजी पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावा, असा संदेश त्यांनी दिला आहे. राज ठाकरे यांची केलेली पोस्ट.. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना, सस्नेह जय महाराष्ट्र, १४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे. यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील. शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.. तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या. यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत. झाडं लावून लोकांचे, निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.. फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत. बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच. आपला नम्र राज ठाकरे ।



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *