![]()
भाजप नेते, उद्योजक आणि विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले अरुण लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधींशी करत केलेल्या विधानामुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असलेल्या लखाणी यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गांधीजींसारखेच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचा दावा केला. काय म्हणाले अरुण लखाणी? एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरुण लखाणी म्हणाले, “महात्मा गांधी उपवासाचं आवाहन करायचे आणि संपूर्ण देश ते पाळायचा. तशीच क्षमता आणि तसाच आदर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांच्या मनात आहे. मोदींनी आवाहन केलं की लोक प्रतिसाद देतात. त्यांनी काटकसर करण्याचं आवाहन केलं आणि लोकांनी इंधनाचा वापर कमी करण्यास सुरुवात केली.” यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील एका घटनेचाही उल्लेख केला. “मोदींच्या आवाहनानंतर आमच्या घरातूनही रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार २७ नोव्हेंबरला होणारा स्वागत समारंभ १६ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पत्रिका छापून वाटल्या होत्या, त्यामुळे काही गोंधळ झाला. मात्र लग्न नियोजित वेळेतच होणार आहे,” असे त्यांनी सांगितले. मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावरील १२ वर्षांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल बोलताना लखाणी म्हणाले, “मोदींचा हा १२ वर्षांचा कालावधी भारतासाठी सुवर्णकाळ ठरला आहे. देशाचा विकास झाला, जगभरात भारताचा सन्मान वाढला. महिला, गरीब आणि वंचित घटकांसाठी राबवण्यात आलेल्या योजना क्रांतिकारी ठरल्या आहेत.” काँग्रेसने माघार का घेतली? विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार न दिल्याबाबत बोलताना त्यांनी महायुतीच्या ताकदीचा उल्लेख केला. “महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ होते. त्यामुळे काँग्रेसला विजयाची आशा नव्हती. निवडणूक लढवून फायदा नसल्याने त्यांनी माघार घेतली,” असा दावा लखाणी यांनी केला. राष्ट्रवादी-काँग्रेस विलीनीकरणावर मौन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता लखाणी यांनी सावध भूमिका घेतली. “मी राजकारणात नवीन आहे. अनेक वर्षे राजकारणात असलेल्या लोकांनाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. त्यामुळे मी यावर भाष्य करणे टाळतो,” असे ते टीव्ही9 मराठीशी बोलताना म्हणाले. संबंधित बातम्या वाचा… काँग्रेसचे मिशन विलीनीकरण!:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ममता बॅनर्जीनाही प्रस्ताव, नाना पटोले म्हणाले- देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत यावे लागेल!
राज्यात आणि देशाच्या राजकारणात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नवे बळ मिळाले आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाल्याचे सूचक विधान केले. सविस्तर बातमी वाचा
Source link
सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचं मोठं विधान:'महात्मा गांधींनी उपवासाचं आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद'