Headlines

शिंदे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ:उदय सामंत म्हणाले 'राजकीय अर्थ काढू नका', तर योगेश कदमांचे सूचक वक्तव्य




विधानभवनात मंगळवारी (8 जुलै) घडलेली एक घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, सत्ताधारी आणि विरोधक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी या भेटीला निव्वळ ‘राजकीय संस्कृती’ म्हटले आहे, तर राज्यमंत्री योगेश कदम यांनी “येत्या काळात एनडीएची (NDA) ताकद वाढताना दिसेल” असे सूचक विधान करून राजकीय सस्पेन्स आणखी वाढवला आहे. योगेश कदम यांचे सूचक वक्तव्य: “लवकरच मोठे निर्णय दिसतील” शिंदे-पवार भेटीवर प्रतिक्रिया देताना आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक विधान केले आहे. “शरद पवारांच्या आजूबाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) कार्यालय असतानाही, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे दालन निवडले. यातून येत्या काळात काही नवीन राजकीय समीकरणे जुळून येतील, असे दिसते.” “2029 च्या निवडणुकांना अजून अवधी आहे, पण येत्या काही महिन्यांत महायुतीच्या दृष्टीने अतिशय चांगल्या घडामोडी घडताना दिसतील. आज एनडीए (NDA) देशात आणि महायुती राज्यात मजबुतीने उभी आहे, ही ताकद वाढताना आपल्याला लवकरच पाहायला मिळेल,” असा मोठा दावा कदम यांनी केला आहे. उदय सामंत यांचा खुलासा: “राजकीय अर्थ लावू नका, ती महाराष्ट्राची संस्कृती” दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या भेटीला वेगळा राजकीय रंग देण्यास नकार दिला आहे. “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. ते जर एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात आले असतील, तर त्यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे, जी काही लोक विसरले आहेत. या परंपरेनुसारच शिंदेंनी पवारांचा सत्कार केला, यात कोणताही राजकीय अर्थ लावू नये.” शरद पवारांनी शिंदेंच्या दालनात आमदारांची बैठक घेतल्याच्या प्रश्नावर सामंत म्हणाले, “हीच तर राजकीय संस्कृती आहे. ते तिथे भेटले म्हणजे सगळेच आमदार काही शिवसेनेत आले नाहीत. सत्कार झाल्यानंतर शिंदे साहेब पुन्हा कॅबिनेटला निघून गेले. त्यामुळे सूत्रांच्या हवाल्याने होणाऱ्या उलटसुलट चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही.” तसेच, ‘मिसिंग लिंक’च्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या “मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका” या विधानाचेही सामंत यांनी समर्थन केले आणि काँग्रेसवर टीका केली. भेटीत नेमके काय घडले? कॅबिनेट बैठक सोडून शिंदेंची धाव शरद पवार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी विधानभवनात आले होते. ही बैठक संपल्यानंतर त्यांनी सोबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांना घेऊन थेट एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे मोर्चा वळवला. शिंदे त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यस्त होते. मात्र, पवार स्वतः आल्याचे समजताच शिंदेंनी कॅबिनेट बैठक अर्ध्यावर सोडली आणि तातडीने दालनात येऊन पवारांची 20 मिनिटे चर्चा केली. शिंदेंनी त्यांचा सत्कार केला आणि ते पुन्हा कॅबिनेटला परतले. शिंदेंच्या दालनातूनच पवारांनी नंतर आपल्या आमदारांशी चर्चा केली. भेटीमागील राजकीय गणिते नुकतेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT) 6 खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या खासदारांवरही शिंदेंची नजर असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर पवारांनी थेट शिंदेंच्या दालनात जाणे, हा एक ‘राजकीय मेसेज’ असू शकतो. राज्यात महायुतीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असले, तरी पवारांनी फडणवीसांऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणे अनेकांच्या नजरेत भरले. यातून पवारांनी ‘आपण सत्तेतील कोणत्याही प्रमुख नेत्याशी संवादाचे दरवाजे उघडे ठेवू शकतो’ हा संदेश फडणवीसांना आणि महायुतीला दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शरद पवार यांच्या राजकारणात कोणतीही भेट सहज किंवा विनाकारण नसते. सार्वजनिक वक्तव्यांपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून धक्का देण्याची त्यांची शैली आहे. त्यामुळे ही केवळ 20 मिनिटांची ‘शिष्टाचार भेट’ होती, की महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी ‘महाभूकंपाची’ नांदी, हे येणारा काळच ठरवेल. संबंधित वृत्त वाचा गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना बैठकीसाठी अख्खे विधानभवन काय ओस पडले होते का? समोरच वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी भवन असताना गद्दाराच्या दारात जाणे आम्हाला पटत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *