Headlines

भोंदूबाबा प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी:पुण्यात 'गुलाबो गॅंग' आणि 'बिटिया फाउंडेशन'चे आंदोलन




भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करण्यात आले. जंगली महाराज रोडवरील झाशीची राणी पुतळ्याजवळ शुक्रवारी ‘गुलाबो गॅंग, पुणे’ आणि ‘बिटिया फाउंडेशन, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महिलांचे रक्षण करणे हे परम कर्तव्य असताना, रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात अत्यंत संशयास्पद आणि आक्षेपार्ह भूमिका घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलनकर्त्या संगीता तिवारी यांनी ‘महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रक्षक नव्हे तर भक्षक निघाल्या आहेत,’ असा घणाघाती आरोप केला. तिवारी यांच्या मते, रुपाली चाकणकर यांचे भोंदूबाबा अशोक खरातशी अत्यंत जवळचे संबंध राहिले आहेत. खरात बाबाचे पाय स्वतःच्या पदराने पुसणे, एकमेकांना डोळ्यात पाहून केक भरवणे, त्याच्यासाठी पावसात छत्री धरणे, कामाख्या देवस्थान येथे एकत्र प्रवास करून एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करणे, आणि त्या भोंदूला थेट ‘विठ्ठलाची’ उपमा देणे, अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याशिवाय, पीडित महिलांना भोंदू बाबाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करू न देणे आणि एका पत्रकाराला महिला आयोगाच्या माध्यमातून दमदाटी करणे, असे गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात पोलीस यंत्रणा, एसआयटी, ईडी आणि गृहखाते अद्याप शांत का आहेत, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. यामध्ये मोठे काळेबेरे असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. या सर्व पार्श्वभूमीवर, चाकणकर यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशनने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *