![]()
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने राज्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एका आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिंकदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत ४० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आरोपी अरविंद आरोगोंडा याने एका पालकाची वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी १८ मार्च रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी मुंबई पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती आणि तो ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पुण्यातील येरवडा परिसरातही त्याने फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने येरवडा पोलिसांनी त्याला ऑर्थर रोड कारागृहातून तपासासाठी ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध हैद्राबाद आणि मुंबईत फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी आणि त्याच्या साथीदाराने हैद्राबादमध्ये ‘एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि.’ नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या पुणे आणि मुंबईत शाखा उघडण्यात आल्या होत्या. समाजमाध्यमांवर वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याची जाहिरात ते प्रसारित करत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश मार्गदर्शनासाठी ते पाच लाख रुपये, तर खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी तीन लाख रुपये शुल्क आकारत होते. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यास पैसे परत करण्याचे आमिष दाखवून त्यांनी आतापर्यंत ४० विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक किशोर बेरड, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय आणि साईनाथ म्हस्के यांनी ही कारवाई केली.
Source link
तेलंगणातील आरोपी अटकेत, वैद्यकीय प्रवेशाचे आमिष:राज्यभरातील 40 विद्यार्थी-पालकांची लाखो रुपयांची फसवणूक