![]()
जळगाव शहरातील ममुराबाद रोडवर कावड यात्रेदरम्यान भरधाव ट्रक यात्रेत घुसल्याने ८ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला असून, चालकाला मारहाण केल्याची माहिती आहे. तसेच, ट्रकचालकाला पकडून बेदम मारहाण केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चिमुकल्याला ५० मीटर फरफटत नेले मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद रोडवरून कावड यात्रा अत्यंत शांततेत मार्गस्थ होत होती. याचवेळी मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने यात्रेतील भाविकांना धडक दिली. यात एका ८ वर्षीय बालकाला ट्रकने अक्षरशः ५० मीटरपर्यंत चिरडत आणि फरफटत नेले. या भीषण धडकेत या निष्पाप चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाचा उद्रेक आणि जाळपोळ डोळ्यांसमोर लहानग्याचा असा करुण अंत झाल्याचे पाहून जमावाचा संताप अनावर झाला. त्यांनी तातडीने ट्रकचालकाला पकडून त्याला तिथेच बेदम चोप दिला. एवढ्यावरच न थांबता, संतप्त नागरिकांनी या ट्रकला भररस्त्यात पेटवून दिले. विशेष म्हणजे, हा ट्रक पूर्णपणे जळून खाक व्हावा या उद्देशाने आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबालाही जमावाने पुढे जाऊ दिले नाही, त्यामुळे अग्निशमन दलाला माघारी परतावे लागले. रास्ता रोको आणि पोलिसांची मध्यस्थी अपघातानंतर आक्रमक झालेल्या नागरिकांनी बालकाचा मृतदेह रस्त्यावरच ठेवून जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. त्यामुळे ममुराबाद रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त तैनात केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि जमावाला पांगवल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. सध्या पोलिसांनी जळालेल्या ट्रकची आग विझवली असून, वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे वाहतुकीचे नियम, भरधाव वेगाने चालवली जाणारी वाहने आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हेही वाचा.. अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग:3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर धूर पसरला. त्यावेळी NICU मध्ये 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. सविस्तर वाचा
Source link
जळगावात कावड यात्रेत घुसला भरधाव ट्रक:8 वर्षीय चिमुकल्याचा चिरडले, संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला