Headlines

पोतरा येथे विशेष ग्रामसभेवर गावकऱ्यांचा बहिष्कार:9 पैकी एकही जागा ओबीसीला आरक्षित झाली नसल्याचे कारण




कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे ग्रामपंचायतीच्या 9 पैकी एकही जागा ओबीसीसाठी आरक्षित झाली नसल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी शुक्रवारी ता. 12 विशेष ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज घेण्यात आली. त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी मंडळ अधिकारी व्ही. एन. किन्होळकर, ग्राम महसूल अधिकारी दिनेश राऊत, ग्रामपंचायत अधिकारी संदीप अंभोरे, पोलिस पाटील अनुराधा मारकोळे यांच्यासह गावकरी शंकर मुलगीर, गणेश मुलगीर, माजी सरपंच रघुनाथ गुहाडे, गुणाजी फोफसे, रामराव मुलगीर, शिवाजी मुलगीर, दगडू मुलगीर, शामराव रायपुरे, सोपान रणवीर यांच्यासह गावकरी उपस्थित होते. पोतरा ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागाचे एकूण 9 सदस्य आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार 50 टक्के पेक्षा अधिक आरक्षण करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तीन जागा अनुसुचीत जमातीसाठी तर दोन जागा अनुसुचीत जातीसाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात आले. सदर आरक्षण 50 टक्के झाल्यामुळे उर्वरीत जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गावात 70 टक्के लोकसंख्या ओबीसी असतांना यावेळी ओबीसीसाठी एकही जागा आरक्षित का नाही असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. मागील वेळी ग्रामपंचायतीमध्ये दोन जागा आरक्षित होत्या त्यानुसार जागाआरक्षित होणे अपेक्षीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी आरक्षणाची मर्यादा दाखविल्यानंतर गावकऱ्यांनी आरक्षण सोडत मान्य नसल्याचे सांगत ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. या ग्रामसभेतून गावकऱ्यांनी काढता पाय घेतला. या संदर्भात गावकऱ्यांनी ओबीसी आरक्षण संपविण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. या आरक्षण सोडतीच्या विरोधात निवडणुक विभागाकडे अपील करण्याची तयारी गावकऱ्यांनी सुरु केली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी संदीप अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, या विशेष ग्रामसभेवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला असून आरक्षण सोडत मान्य नसल्याचे सांगितले. त्यानुसार इतिवृत्तामध्ये नोंद घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी स्वरुपात माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *