Headlines

आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय!:23-24 जून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद; विठुरायाच्या मूर्तीवर होणार विशेष संवर्धन प्रक्रिया




आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) विशेष संवर्धन आणि लेपन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने देशभरातील वारकरी, भाविक आणि पर्यटकांना या दोन दिवसांत पंढरपूरला दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे. 22 ते 24 जूनदरम्यान मूर्तीवर विशेष लेपन श्री विठ्ठलाच्या मूर्तीची नैसर्गिक झीज वाढत असल्याचे निरीक्षण समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी प्रतिनिधी आणि पुरातत्त्व विभागाची बैठक झाली होती. या बैठकीत मूर्तीचे पारंपरिक की रासायनिक पद्धतीने संवर्धन करायचे यावर सविस्तर चर्चा झाली. अखेरीस तज्ज्ञांच्या शिफारशींनुसार 22 ते 24 जूनदरम्यान रासायनिक पद्धतीने मूर्तीवर संरक्षक लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मूर्तीच्या पायाजवळ झीज; सूक्ष्म दुरुस्ती होणार माहितीनुसार, विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाजवळ झीज होऊन खड्ड्यासारखा भाग निर्माण झाला आहे. तसेच इतर काही भागांमध्येही झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी मूर्तीच्या मूळ दगडाशी सुसंगत दगडी पावडर आणि विशेष सेंद्रिय रसायनांचा वापर करून झिजलेल्या भागांची दुरुस्ती केली जाणार आहे. यासोबतच मूर्तीचे आयुष्यमान वाढावे यासाठी संरक्षक आवरण (Protective Coating) देखील दिले जाणार आहे. 23 आणि 24 जूनला दर्शन पूर्णपणे बंद या संवर्धन प्रक्रियेदरम्यान मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि तांत्रिक काम निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी: 23 जून – मंदिर दर्शनासाठी बंद 24 जून – मंदिर दर्शनासाठी बंद या दोन्ही दिवसांत कोणत्याही प्रकारचे सर्वसामान्य दर्शन उपलब्ध असणार नाही. ASI आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रक्रिया संपूर्ण संवर्धन प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग आणि मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, विठ्ठलाच्या मूर्तीचे पावित्र्य कायम राखत वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वीही चार वेळा झाले संवर्धन विठ्ठलाच्या मूर्तीचे यापूर्वीही वेळोवेळी संवर्धन करण्यात आले आहे. सन 1988, 2005, 2012, 2020 या चार टप्प्यांमध्ये मूर्तीवर लेपन आणि संरक्षणाची कामे झाली होती. आता जवळपास पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाल्याने ही प्रक्रिया राबवली जात आहे. वारीपूर्वी भाविकांसाठी महत्त्वाचे आवाहन आषाढी वारीसाठी राज्यासह देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्याआधी मूर्तीचे संवर्धन पूर्ण व्हावे आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवता यावी यासाठी मंदिर प्रशासनाने 23 व 24 जून रोजी पंढरपूरला येण्याचे नियोजन टाळावे, असे स्पष्ट आवाहन केले आहे. विठुरायाच्या मूर्तीचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *