Headlines

नकारात्मक परिस्थितीत माणुसकी जपणे महत्त्वाचे – डॉ. सबनीस:मनोहारी मैत्र संघातर्फे पुरस्कार वितरण सोहळ्यात मत व्यक्त




आजच्या नकारात्मक परिस्थितीत माणुसकी, नीतीमत्ता आणि संस्कृती जपणे हेच सर्वात मोठे ध्येय असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मनोहारी मैत्र संघातर्फे आयोजित ऊर्जाशील अभियंता आणि मातृभूमी सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे संयोजक मनोहर कोलते मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यात विजय कुमार माने यांना ऊर्जाशील अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशांत जगताप, शांताराम ढमाले देशमुख, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रकाश मांडरे आणि वस्ताद काका पवार यांना मातृभूमी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात ‘मनोहारी विचार’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सबनीस यांनी पुढे सांगितले की, या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे खेळ, राजकारण, समाजकारण, कला आणि साहित्य या सर्व क्षेत्रांना समृद्ध करणारा एक ‘निरोगी आणि सुंदर महाराष्ट्र’ पाहायला मिळत आहे. ॲड. प्रमोद आडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, तो एखाद्या व्यक्तीच्या अथक परिश्रमांचा, समर्पणाचा आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव असतो. उपस्थित सर्व पुरस्कारार्थींनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजासाठी प्रेरणास्थान निर्माण केले आहे, असेही ते म्हणाले. ऊर्जाशील अभियंता पुरस्कार प्राप्त विजय कुमार माने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या कार्यासाठी मिळालेली ऊर्जा सहकारी, वरिष्ठ आणि ग्राहकमित्रांकडून प्राप्त झाली आहे. प्रशांत जगताप यांनी नमूद केले की, मूल्यांची जपणूक करायची असेल तर त्याची किंमत मोजावी लागते. हा पुरस्कार भविष्यात देशाची सेवा करण्यासाठी अधिक ऊर्जा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ही शाबासकीची थाप असली तरी जबाबदारीची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *