Headlines

वृद्धाचा खून करून पसार झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या:स्थानिक गुन्हे शाखेची मढी परिसराला वेढा घालून कारवाई




शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादातून एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. विलास दादा गावडे (वय ५५, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने पोपटराव रावजी गावडे (७५) या वृद्ध शेतकऱ्याची निघृण हत्या केली होती. पिसोरेखांड येथील या हत्याकांडानंतर आरोपी विलास गावडे हा पोलिसांना चकवा देण्यासाठी फरार झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हरीश भोये यांना तपासाचे आदेश दिले. भोये यांनी जराही वेळ न घालवता पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे, पुष्कर कडू, सचिन भाबड आणि अंमलदारांची दोन स्वतंत्र पथके तयार करून आरोपीच्या मागावर रवाना केली. तपास पथक १२ जून २०२६ रोजी आरोपीचा माग काढत असतानाच, पोलिसांच्या गोपनीय जाळ्याला मोठे यश आले. आरोपी विलास गावडे आपली ओळख लपवून पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध ‘मढी मायंबा गडाच्या’ शिवारात लपून बसल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मढी गड परिसराला चहूबाजूंनी वेढा घातला. गडावर पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी असताना, पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने आणि शिताफीने शोधमोहीम राबवली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दबा धरून बसलेल्या पथकाने फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून विलास गावडेला मढी गडावरच झडप घालून ताब्यात घेतले. मुरमासारख्या किरकोळ कारणावरून वृद्ध नातेवाईकाचा जीव घेणाऱ्या या क्रूर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणि तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. ‘बांधाचा वाद’ ठरला खुनाचे कारण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी विलास गावडे याने गुन्ह्याची कबुली दिली. पिसोरेखांड येथे शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ कारणावरून त्याचा मयत पोपटराव गावडे यांच्याशी वाद झाला होता. याच रागातून त्याने वृद्ध शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *