Headlines

ठाकरे गटाच्या खासदाराच्या गाडीला अपघात:विक्रोळीत ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली, पक्षाच्या बैठकीला जाताना घडली घटना




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावलेल्या पक्षाच्या खासदारांच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला जात असताना, मुंबई ईशान्यचे नवनियुक्त खासदार संजय दीना पाटील यांच्या कारचा किरकोळ अपघात झाला. विक्रोळी महामार्गावर त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय दीना पाटील हे आज सकाळी ‘मातोश्री’वर आयोजित बैठकीसाठी वाशीकडून वांद्रेच्या दिशेने निघाले होते. विक्रोळी हायवेवर पोहोचल्यानंतर अचानक लागलेल्या ब्रेकमुळे त्यांच्या ताफ्यातील काही वाहने एकमेकांना मागून धडकली. या अपघातात गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही दुखापत न झाल्यामुळे खासदार संजय दीना पाटील यांनी थांबणे पसंत न करता थेट ‘मातोश्री’ गाठले आणि नियोजित बैठकीला प्रत्यक्ष उपस्थिती लावली. ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे बैठकीला विशेष महत्त्व गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचे काही खासदार सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात असून ते फुटणार, अशा अफवा आणि चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. अशा अत्यंत संवेदनशील वेळीच खासदाराच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त समोर आल्याने सुरुवातीला राजकीय वर्तुळात चिंतेचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘मातोश्री’वरील बैठकीचे सविस्तर चित्र उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पक्षात कोणतीही फूट नसल्याचे सांगत सर्व ९ खासदार पक्षासोबत आणि बैठकीला उपस्थित असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), अनिल देसाई (मुंबई दक्षिण-मध्य), संजय दीना पाटील (अपघातानंतरही प्रत्यक्ष हजर), राजाभाऊ वाजे (नाशिक) हे प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली होती. तर ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी) हे खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. आम्ही सर्वजण पूर्णपणे एकत्र आहोत “आमचे सर्व ९ पैकी ९ खासदार या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होते. ५ खासदार काही वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे मुंबईत प्रत्यक्ष येऊ शकले नसले, तरी त्यांनी ऑनलाईन हजेरी लावून आपली निष्ठा आणि भूमिका मांडली आहे. आम्ही सर्वजण पूर्णपणे एकत्र आहोत. आज प्रत्यक्ष येऊ न शकलेले पाचही खासदार पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत,” असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *