![]()
महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला केवळ ४ खासदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, उर्वरित ५ खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होते, अशी माहिती देत शिवसेना (उबाठा) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बंडाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकूण ९ खासदार निवडून आले आहेत. आजच्या संवेदनशील बैठकीत अनिल देसाई (मुंबई दक्षिण-मध्य), अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), संजय दीना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व), राजाभाऊ वाजे (नाशिक) हे चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली), संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) या खासदारांनी मातोश्रीवरील बैठकीला ऑनलाईन/फोनवरून उपस्थिती दर्शवली. खासदारांचे मुंबईत न येण्याची कारणे कोणती? उद्धव ठाकरेंसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी अनुपस्थित खासदारांबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. “पक्षाचे सर्व ९ खासदार बैठकीला उपस्थित होते, फक्त काहींची उपस्थिती डिजिटल माध्यमातून होती,” असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा विधानपरिषदेची निवडणूक लढवत असल्याने ते मतदारसंघातील कामात व्यस्त होते. संजय देशमुख यांच्या घरी सध्या मुलीच्या लग्नाची धावपळ सुरू असल्याने ते प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत. भाऊसाहेब वाकचौरे व ओमराजे निंबाळकर हे दोन्ही खासदार कौटुंबिक आणि वैद्यकीय कारणास्तव ऑनलाईन जोडले गेले होते. तर संजय जाधव यांनी फोनवरून बैठकीत सहभाग नोंदवला” अनुपस्थित खासदार २-३ दिवसांत मातोश्रीवर भेट देतील संजय राऊत म्हणाले, “ही आमची दरमहा नेहमीप्रमाणे होणारी बैठक आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे खासदारांना मार्गदर्शन करतात. जे खासदार आज प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, ते येत्या दोन-तीन दिवसांत स्वतः ‘मातोश्री’वर येऊन पक्षप्रमुखांची भेट घेतील,” अशी माहितीही त्यांनी दिली. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये तथ्य नाही – आमदार कैलास पाटील दुसरीकडे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गैरहजेरीवरून सुरू असलेल्या चर्चांवर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. “लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच अशा प्रकारच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलाची तब्येत बरी नसल्याने ते आजच्या बैठकीला तसेच काल अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा आढावा बैठकीला हजर राहू शकले नाहीत. त्यांनी याची रीतसर पूर्वकल्पना पक्ष नेतृत्वाला दिली होती. आम्ही २०२२ मध्येच उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे आणि तो कायम आहे,” असे सांगत कैलास पाटील यांनी ठाकरे गटात कोणतीही गळती नसल्याचा दावा केला.
Source link
'मातोश्री'वरील बैठकीला केवळ 4 खासदारांची प्रत्यक्ष हजेरी:5 जणांची ऑनलाईन उपस्थिती; संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी