Headlines

गुंज शिवारात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा:2 दुचाकी, तीन मोबाईल जप्त, चौघांवर वसमत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल




वसमत तालुक्यातील गुंज शिवारात झन्नामन्ना जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन दुचाकी , तीन मोबाईलसह 1.21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 7 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. याशिवाय स्थानिक पोलिसांना देखील अवैध व्यवसायावर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाभरात मटका जुगार बेकायदेशीर दारू विक्री विरुद्ध कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली असून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान वसमत तालुक्यातील गुंज शिवारात शेतातील आखाड्यावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, जमादार विजयकुमार उपरे, साहेबराव राठोड यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास शेतातील आखाड्यावर जाऊन छापा टाकला. यामध्ये चौघे जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी घटनास्थळावरून दोन दुचाकी, तीन मोबाईल व रोख रक्कम असा 1.21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक निरदोडे यांच्या तक्रारीवरून शेख फेरोज, शेख रहिम, नितीन जाधव (सर्व रा. वसमत), ज्ञानेश्‍वर माखणे (रा. रुंज) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *