Headlines

पुण्याच्या बँकेतून 200 कोटी विदेशात; आयटीची नजर:2143 कोटींचा उदगीर, लातुरातील महाघोटाळा




उदगीर (लातूर) सीएने बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे केलेल्या २१४३ कोटींच्या परकीय चलन घोटाळ्यात आता बँकिंग क्षेत्रातील मोठे ‘सिंडिकेट’ उघडकीस येण्याची शक्यता आहे. बनावट संस्थांच्या नावे हजारो कोटी रुपये परदेशात वळवण्याचे हे रॅकेट बँकांच्या ‘अर्थपूर्ण’ सहभागाशिवाय शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या सिंडिकेटमधील सीए श्याम कलानी रविवारी उदगीर पोलिसांना शरण आला आहे. सूत्रांनुसार बँकिंग व्यवहारांना मुभा देणाऱ्या देशभरातील बँका आयकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. या काळ्या पैशातील सुमारे २०० कोटी रु. पुण्यातील एका नामांकित खासगी बँकेतून थेट विदेशात ट्रान्सफर झाल्याची गोपनीय माहिती प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहे. या गंभीर प्रकारामुळे आता तपासी पथकांनी मोर्चा पुण्याकडे वळवला आहे. या बँकेचे कोट्यवधींचे व्यवहार, जबाबदार अधिकारी आणि थेट बँकेच्या संचालक मंडळाचीच सखोल चौकशी केली जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. प्राथमिक तपासात केवळ पुणेच नव्हे, तर देशभरातील अनेक प्रमुख शहरांमधील बँका या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था पोखरणाऱ्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक गैरव्यवहारात सीए आणि शेल कंपन्यांनंतर आता बँकांचा सहभाग समोर आल्याने, या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य अधिकच वाढले आहे. बँकेची फसवणूक याच बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे अधिकृत बँक डीलर्समार्फत बेकायदेशीरपणे निधी परदेशात पाठवण्यात आला. या गुन्ह्यामुळे संबंधित व्यक्तींना अनुचित आर्थिक लाभ झाला असून देशाच्या परकीय चलन साठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या शहरांमधील बँकांवर लक्ष केंद्रित पुणे : खासगी बँकेतून २०० कोटींचा व्यवहार, अधिकारी व संचालक मंडळाची होणार चौकशी.
पंजाब : चंदीगड, कर्नाटक : बेंगळुरू येथील आयटी हबमधील बँक शाखांचा वापर.
दिल्ली आणि एनसीआर : नवी दिल्ली आणि नोएडा येथील बँकांमधून बनावट ‘शेल’ कंपन्यांचे व्यवहार. देशातील पहिलाच प्रकार; आयटी विभागाने दाखल केला गुन्हा एका सनदी लेखापालाने अधिकारांचा गैरवापर करत कोणतीही खात्री न करता तब्बल २१४३ कोटी रुपये बोगस कंपन्यांमार्फत परदेशात पाठवण्यास मदत केल्याचा हा देशातील पहिलाच मोठा व थेट प्रकार उघडकीस आला. येथे आयकर अन्वेषण विभागाचे उपायुक्त दीपककुमार यांच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणत थेट पोलिसांत फिर्याद दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *