![]()
श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान शिऊर फडाचा २८१ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह यंदा वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडाळा येथे भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. १७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता मंगळवारी होणार आहे. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण खंडाळा परिसराला सध्या या भक्तिसोहळ्यामुळे चैतन्याचे आणि उत्सवाचे रूप आले आहे. श्री संत शंकरस्वामी महाराजांनी २८१ वर्षांपूर्वी सुरू केलेली अन्नदानाची महान परंपरा खंडाळा ग्रामस्थ, सप्ताह समिती, तरुण मंडळ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी आज ३ शतकांनंतरही तितक्याच निष्ठेने व भव्य स्वरूपात जपली आहे. सप्ताहाच्या सांगतेसाठी १०१ क्विंटल साखरेचा शिऱ्याचा महाप्रसाद तयार करण्यात आला आहे. हा महाप्रसाद अत्यंत शिस्तबद्ध आणि जलद गतीने वितरीत करण्यासाठी प्रशासकीय व सामाजिक स्तरावर अद्भुत नियोजन आखण्यात आले आहे. अवघ्या १० मिनिटांत १ लाख भाविकांना एकाच वेळी महाप्रसाद वितरित करण्याची सूक्ष्म आखणी करण्यात आली आहे. या सोहळ्यास संत सावता महाराजांचे १९ वे वंशज सावता महाराज वसेकर, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश पाटील बोरनारे, राजेंद्र साळुंखे, दशरथ बनकर, मनोज वाकचौरे आणि सुनील व्यवहारे या प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. खंडाळा गावाचे हे नियोजन, शिस्त आणि तरुणांचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे. श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या पावन आणि पवित्र भूमीत येण्याचा योग आला, हे माझे परमभाग्य आहे, असे भावुक उद्गार बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांनी काढले. खंडाळा येथे सप्ताहास त्यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, नगराध्यक्ष दिनेश परदेशी, संस्थान अध्यक्ष एकनाथ जाधव, भाजप सरचिटणीस सुधीर शेवाळे, आदर्श सरपंच मंगेश साबळे, कल्याण दांगोडे, सुनील दादा पैठणपगारे, दशरथ बनकर, कैलास पवार, राजू राजपूत, भागिनाथ दादा मगर, राजू निकम, किशोर जगदाळे, गोरख आहेर, आनंदी अन्नदाते, हाजी अकील शेख, उमाकांत ठोंबरे, संदीप निर्मळ व ॲड. कैलास नारायण पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संतांच्या विचारांमुळे एकता टिकून सप्ताहाच्या सातव्या दिवशी कीर्तनसेवा बजावताना संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अरणचे सचिव प्रभू महाराज यांनी सामाजिक एकतेवर जोर दिला. ज्ञानोबा-तुकोबांपासू न ते संत शंकरस्वामींपर्यंत सर्वांनी मानवाच्या सेवेचा आणि प्रेमाचा संदेश दिला. जोपर्यंत वारकरी विचार जिवंत आहे तोपर्यंत कोणीही जाती-पातीच्या नावावर समाजाचे वर्गीकरण करू शकणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
Source link
श्री संत शंकरस्वामी महाराज सप्ताहाच्या सांगतेला 101 क्विंटल साखरेचा प्रसाद:खंडाळा येथे 10 मिनिटांत 1 लाख भाविकांना वाटपाचे नियोजन