![]()
आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लिश डिजिटल प्राथमिक शाळेला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. शाळेचा
.
कारसुळची शाळा तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या आदर्श ठरत असल्याचे नमूद करत जगताप यांनी शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा व ग्रामपंचायतीकडून करण्यात येणारे प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, असे आवाहन केले. मन लावून अभ्यास करावा, ध्येय निश्चित करावे आणि भविष्यात चांगले अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे, असा संदेश त्यांनी दिला.
डिजिटल युगातील मोबाईल व टीव्हीच्या वाढत्या वापराबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवून पुस्तक वाचन, अभ्यास, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना अधिक वेळ द्यावा, असे त्यांनी सांगितले. “मोबाईल तुमच्या हातात असावा; मोबाईलने तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ नये, हा संदेश त्यांनी दिला.
शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लहान वयापासूनच त्यांची तयारी करण्याची सवय लावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ, संचालक मधुकर ताकाटे, उपसरपंच शामराव शंखपाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघचौरे, उपाध्यक्ष तथा सदस्य देवेंद्र काजळे आदी उपस्थित होते.