![]()
नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार खुर्द शिवारात मंगळवारी (७ जुलै) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. पाटीलबवाडी (कोल्हार खुर्द) येथे अंत्यविधी उरकून परतणाऱ्या ममदापूर (ता. राहाता) येथील कारमधील तिघांवर काळाने झडप घातली. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू शेख, कदीर शेख आणि नजीर गुलाब सय्यद (सर्व रा. ममदापूर) अशी जखमींची नावे आहेत. सिंदखेडा डेपोची सिंदखेडा-पुणे ही एसटी बस (एमएच १४, एलएक्स ९८१८) नगरच्या दिशेने जात होती. दरम्यान, महामार्गाचे काम सुरू असल्याने एका बाजूचा रस्ता खराब होता. त्यामुळे बसचालकाने कोल्हार खुर्द शिवारातील एका ढाब्याजवळून बस विरुद्ध बाजूने (राँग साईड) घातली. त्याच वेळी समोरून टाटा व्हिस्टा कार (एमएच १७ एज २८१५) कोल्हारकडे येत होती. वेगातील बसचालकाला समोरून येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बसमधील प्रवासी भयभीत झाले होते, तर एसटी चालक बस सोडून घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. रस्त्यावरील वाहने जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Source link
एसटी कारच्या अपघातामध्ये अंत्यविधीहून परतणारे तीन गंभीर:कोल्हार शिवारातअपघात; चालक फरार