![]()
रावसाहेब मरकड | शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवर मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेल्या वन विभागाच्या पर्यटन केंद्राचे तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर थाटात उद्घाटन झाले खरे, मात्र अवघ्या काही दिवसांतच या केंद्राच्या कारभाराचे आणि दुरवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. पर्यावरण संवर्धनाचे मोठे स्वप्न दाखवून उभारलेल्या या केंद्रात आता सुविधांची मोठी वानवा दिसून येत असून, पर्यटकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहांवर साध्या पाण्याच्या टाक्याच बसवल्या नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करून हा प्रकल्प नेमका कोणाच्या कल्याणासाठी उभारला, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. वन विभागाने पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण, वन्यजीव व पक्ष्यांविषयी जनजागृती आणि स्थानिक निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी हे केंद्र उभारले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष आणि कथित हलगर्जीपणामुळे शासनाच्या या मूळ उद्दिष्टांनाच हरताळ फासली गेल्याचे चित्र आहे. स्थानिकांना निसर्गाचा आनंद मिळावा हा उद्देश आता केवळ कागदावरच उरला आहे. या पर्यटन केंद्राची दुरवस्था आणि त्यातील घोळ नवीन नाही. यापूर्वीही अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. केंद्रात लावलेली अनेक दुर्मिळ झाडे देखभालीअभावी जळून खाक झाली आहेत, तर सुरक्षेअभावी अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून बसवलेली सौर ऊर्जा यंत्रणाही देखभालीअभावी पूर्णपणे नासधूस झाली आहे. आता पर्यटकांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांवर पाण्याच्या टाक्याच गायब असल्याने, पर्यटक आणि महिलांची मोठी कोंडी होत आहे. वन विभागातील शौचालयावर पाण्याची टाकी नाही. ठेकेदार म्हणातात, मला काही आठवत नाही या संपूर्ण सावळागोंधळाबाबत ठेकेदार पंकज हाके यांना विचारले असता, त्यांनी “याबाबत मला काही आठवत नाही,” असे अत्यंत बेजबाबदार उत्तर देत आपली जबाबदारी झटकली. तर दुसरीकडे, नाशिक विभागाचे वनसंरक्षक (प्रादेशिक) गजेंद्र हिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “या संदर्भात आपल्याला अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. माहिती घेऊन काय ते बोलतो,” असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली. यावरून वन विभागाचा या कोट्यवधींच्या केंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती उदासीन आहे, हे स्पष्ट होते. बेजबाबदार अधिकाऱ्यांना रस्त्यावर जाब विचारु ^वन पर्यटन केंद्रातील कथित अनियमितता, भ्रष्टाचार व दुरवस्थेची शासनस्तरावर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. सामान्य जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही. या केंद्रात तात्काळ सुधारणा न झाल्यास ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ आक्रमक भूमिका घेईल. लवकरच रास्ता रोको आंदोलन करून संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांना रस्त्यावर जाब विचारला जाईल. – बाळासाहेब फटांगडे, जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Source link
गलथान कारभार:शौचालयावर टाक्याच नाहीत, लाखोंचा चुराडा करून वन पर्यटन केंद्र कुणासाठी?