![]()
पुण्यात ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्ने आयोजित केलेल्या युवा स्वरानुभूती मैफलीत कुचिपुडी नृत्याविष्कार आणि संतूर वादनाचे सादरीकरण झाले. या मैफलीत रसिकांना ज्ञान व समृद्धी यातील द्वंद्व दर्शवणारा ‘यदा’ नृत्याविष्कार आणि संतूरचे मधुर सूर अनुभवता आले. ही मैफल शनिवारी कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात रश्मी चोवाल्लूर आणि विद्या चंद्रिका यांच्या कुचिपुडी नृत्याविष्काराने झाली. ‘यदा’ या संकल्पनेतून त्यांनी ज्ञान आणि धनाची देवता सरस्वती व लक्ष्मी यांच्यातील द्वंद्व साकारले. या सादरीकरणात मानवी भावभावना, संवाद आणि नाट्यात्मकता यांचा अनुभव रसिकांना मिळाला. दोन्ही नृत्यांगनांनी प्रभावी अभिनय, लयबद्ध नृत्य आणि वाचिक अभिनयातून द्वंद्व, सख्य व संतुलनाचा समन्वय साधत उत्कृष्ट सादरीकरण केले. नृत्य सादरीकरणानंतर सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना राधिका करंदीकर यांनी रश्मी चोवाल्लूर आणि विद्या चंद्रिका यांच्याशी संवाद साधला. ‘यदा’ संकल्पनेविषयी बोलताना, देवी सूक्त आणि ललिता सहस्रनाम यांसारख्या देवी स्तोत्रांमधून हा विषय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कुचिपुडी नृत्यातील वाचिक आणि नाट्यमय अभिनयाचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना, कलाकार नृत्यातील कवित्त गुणगुणत सादरीकरण करतो, हे वेगळेपणही त्यांनी उलगडले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुण्यातील युवा संतूरवादक निनाद दैठणकर यांची मैफल झाली. त्यांनी राग जोगकंसमधील आलाप, जोड आणि झाला सादर केले. तसेच, रूपक आणि तीनतालातील तीन रचना तबल्याच्या साथीने साकारल्या. निनाद दैठणकर यांच्या वाद्यावरील प्रभुत्व आणि संतूरमधून निघालेले मधुर सूर यामुळे मैफल अधिक प्रभावी ठरली. त्यांना विनय मुंडे यांनी तबल्याची साथ दिली.
Source link
युवा स्वरानुभूती मैफलीत कुचिपुडी, संतूर वादनाचे सादरीकरण:ऋत्विक फाऊंडेशनने आयोजित केली कलाकारांची अनोखी मैफल