Headlines

विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:तानाजी सावंत आणि बसवराज पाटील यांची पुण्यातील भेट, बंद दाराआड तासभर खलबतं, महायुतीचे टेन्शन मिटलं?




धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना एका बंद दाराआड झालेल्या राजकीय भेटीने संपूर्ण निवडणुकीचे चित्रच पालटल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी थेट पुण्यात जाऊन शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. तब्बल तासभर चाललेली ही चर्चा या निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरणार का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाराजीचे मळभ आणि सावंतांचे मौन या निवडणुकीसाठी भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीत, विशेषत: शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये सुप्त नाराजी असल्याची चर्चा होती. धाराशिव आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये तानाजी सावंत यांचा मोठा दबदबा आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सावंत यांनी कोणतीही उघड भूमिका घेतली नव्हती. त्यांच्या या मौनामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम होता, तर दुसरीकडे ‘महायुतीत सर्व आलबेल नाही’, असा संदेश जात असल्याने विरोधकांच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. पुण्यातील ‘त्या’ एका तासात नेमकं काय घडलं? वाढती नाराजी आणि निवडणुकीतील चुरस ओळखून बसवराज पाटील यांनी थेट पुढाकार घेत पुण्यात तानाजी सावंत यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास एक तास सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे, डॅमेज कंट्रोल आणि निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील रणनीती यावर सखोल खलबते झाली. या भेटीमुळे शिवसेना आणि भाजपमधील समन्वयाची दरी मिटली असून, तळागाळातील कार्यकर्त्यांना एकजुटीचा स्पष्ट संदेश गेल्याचे मानले जात आहे. तानाजी सावंतांची ताकद का निर्णायक? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक नेत्यांचा वैयक्तिक प्रभाव अधिक चालतो. तानाजी सावंत यांचे धाराशिव, बीड आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक संस्थांमध्ये मजबूत जाळे आहे. त्यामुळे सावंत यांचे निवडणुकीत सक्रिय होणे हे महायुतीच्या मतांची फाटाफूट रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. आता या भेटीनंतर त्यांचे वजन बसवराज पाटील यांच्या पारड्यात पडल्यास महायुतीची बाजू भक्कम होईल. ९५८ मतांचे गणित आणि विरोधकांचे आव्हान या मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांचे असे एकूण ९५८ मतदार आहेत. कागदावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे एकत्रित संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड आहे. मात्र, काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनीही ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली आहे. देशमुख यांचा मुख्य भर हा सत्ताधाऱ्यांमधील नाराज मतदार आणि संभाव्य ‘क्रॉस व्होटिंग’वर आहे. त्यामुळे महायुतीला गाफील राहून चालणार नाही. निकालावर काय परिणाम होणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेकदा अनपेक्षित धक्का देण्यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे अंतिम आकडा हाती येईपर्यंत कोणताही दावा करणे घाईचे ठरेल. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या तानाजी सावंत आणि बसवराज पाटील यांच्या या महत्त्वपूर्ण भेटीने महायुतीच्या मार्गातील एक मोठा आणि कळीचा अडथळा दूर केल्याचे चित्र आहे. आता या तासभराच्या बैठकीचे रूपांतर विजयात होणार का, याचे उत्तर मतपेटीतूनच समोर येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *