Headlines

मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे दर्जेदार करा:महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे सूचना




महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या आढावा बैठकीत ते शनिवारी (११ एप्रिल) बोलत होते. ही बैठक महापारेषणच्या सभागृहात पार पडली. औंढेकर यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार आहे. पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व आवश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. या कामांदरम्यान सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. ग्राहकांना कमीत कमी वेळ विजेविना राहावे लागेल, असे नियोजन करावे. एका वाहिनीवरील सर्व कामे एकाच दिवशी करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी एकाच कंत्राटदारावर अवलंबून न राहता एकापेक्षा अधिक कंत्राटदारांकडून कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. पूर्वनियोजित कामासाठी ३३ केव्ही वाहिनी महिन्यातून एकापेक्षा जास्त वेळा आणि ११ केव्ही वाहिनी महिन्यातून दोनपेक्षा जास्त वेळा बंद राहणार नाही याची खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्तीची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. या कामांची पडताळणी सांघिक कार्यालयाच्या वतीने स्वतंत्रपणे केली जाईल. कामांच्या दर्जात कोणतीही तडजोड करू नये, असे औंढेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे पावसाळ्यात विद्युत यंत्रणेतील बिघाड कमी होऊन महावितरणचे नुकसान टळेल आणि ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, असेही ते म्हणाले. देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरणने अभियंते आणि कंत्राटदारांसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. या नवीन प्रणालीत मानवी हस्तक्षेप कमी असल्याने कामात पारदर्शकता आणि वेग येईल, असा विश्वास कार्यकारी संचालक औंढेकर यांनी व्यक्त केला. या बैठकीला मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, संदीप दरवडे, संजय सरग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, कार्यकारी अभियंता राजेंद्र नाहटा, प्रेरणा बनकर, वसंत हिवाळे, प्रसाद महातोले, महेंद्र देशमुख, शैलेश कलंत्री, अविनाश राऊत, भूषण पहुरकर, वेंकटेश पेन्सलवार, सोमनाथ मठपती, अविनाश चांदेकर, प्रणिता भालेराव, अनिल चौधरी, प्रभारी वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण गायकवाड, व्यवस्थापक नितीन पाडसवान, महारुद्र नाईकनवरे, सुनील मगरे यांच्यासह अनेक अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *